000
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या जी-विभाग, ऐरोली कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामावर महापालिकेने तोडक कारवाई करत बांधकामाचा काही भाग निष्कासित केला. आयुक्तांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त व उपआयुक्त (अतिक्रमण) यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी साधना पाटील यांच्या नियंत्रणाखाली ही कारवाई करण्यात आली.
महापालिकेच्या माहितीनुसार, ऐरोली येथील संजयकुमार दुबे, प्रतिभाकुमारी आणि ठेकेदार संतोष हळसे यांनी परवानगीशिवाय अनधिकृत बांधकाम सुरू केले होते. या बांधकामासंदर्भात महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ च्या कलम ५४ अन्वये २१ जानेवारी २०२६ रोजी नोटीस बजावण्यात आली होती. संबंधितांना बांधकाम स्वतःहून हटविण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, नोटीसकडे दुर्लक्ष करून बांधकाम सुरूच ठेवल्याने महापालिकेने प्रत्यक्ष तोडक कारवाई केली.
या मोहिमेत जी-विभागाच्या अतिक्रमण विभागातील अधिकारी व कर्मचारी, १८ मजूर, दोन ब्रेकर, दोन घण, एक गॅस कटर, दोन जनरेटर तसेच पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. महापालिकेने स्पष्ट केले असून, शहरातील अनधिकृत बांधकामांवर यापुढेही अशाच प्रकारे कठोर कारवाई सुरू ठेवण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *