गुणवंतांच्या गौरवाने साजरी झाली लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी
मुंबई : दहिसर मधील एन. एल संकुलातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणात ‘उडान परिवार’ आणि ‘रोटरी क्लब ऑफ दहिसर’ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रपुरुष लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे पुण्यस्मरण करून त्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. सुरूवातीला ‘उडान परिवार ज्येष्ठ नागरिक कट्ट्या’चे मार्गदर्शक प्रवीण लाडे यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासातील लोकमान्यांचे महत्त्व कथन केले.
रोटरी क्लब ऑफ दहिसरचे अध्यक्ष प्रकाश कामठे, रोटेरीयन सुप्रसिद्ध लेखक श्रीरंग प्रभू, दिलीप नाबर, हितेश मेहता, विक्रम दवावाला, महेश वर्तक यांची भाषणे झाली. त्यातूनच ‘हातात हात, मनात विश्वास, सेवेने जोडू या, समाजाचा श्वास’ एकतेची ही ज्योत अशीच तेवत राहो. मानवतेचा दीप प्रज्वलित राहो’ ही सद्भावना व्यक्त करण्यात आली. रोटरी क्लब ऑफ दहिसरचे अध्यक्ष रोटेरीयन प्रकाश कामठे यांनी याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक कट्ट्यावरील उपस्थित आणि ‘विराज पर्व अकादमी’ भारतीय सैनिक, पोलीस दल भरती प्रशिक्षक विराज विजय नारकर यांना गौरवचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. उडान परिवार प्रमुख शिरीष बच्चुभाई पारीख आणि भारतीय दलित साहित्य अकादमी, बृहन्मुंबई अध्यक्ष दत्ताराम पुंजाजी घुगे यांना रोटरी क्लब ऑफ दहिसर मुंबईचे सन्माननीय सदस्यत्व प्रदान करण्यात आले. सत्कारमूर्तींचे परिचय वाचन रोटेरीयन हर्षा दवावाला, प्रिया कामठे यांनी केले. चेतना मेहता यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमातच आषाढी एकादशीला निघालेल्या दिंडीत भगवान विठ्ठलाचे रूप घेतलेले हितेश मेहता आणि रुक्मिणीच्या रूपात चेतना मेहता हे दांपत्य अथकपणे १२ तास अन्नपाणी न घेता दिंडीत रथावर उभे होते. दहिसरकरांना त्यांनी साक्षात पंढरीच्या माऊलीचे दर्शन घडविले. त्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. रोटरी क्लब ऑफ दहिसरचे अध्यक्ष प्रकाश कामठे यांच्यावतीने शेकडो ज्येष्ठ नागरिकांना व शालेय विद्यार्थ्यांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले. आभार प्रदर्शन दीपक खेर यांनी केले.
0000
