मुंबई : मुस्लिमांतील वंचित समाज, युवक व महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची एक महत्वपूर्ण बैठक दिल्ली येथे संपन्न झाल्याची माहिती राष्ट्रीय अध्यक्ष सलीम सारंग यांनी मुंबईत दिली. यावेळी ते पुढे म्हणाले कि,असोसिएशनचे देशभरातील संघटनात्मक कामकाज अधिक प्रभावी करण्याबरोबरच समाजातील वंचित व मागास घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध विषयांवर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीत विशेषतः समाजातील वंचित, युवक आणि महिलांना संघटनेशी जोडून शैक्षणिक क्षेत्रात प्रभावी काम कसे उभारता येईल, यावर सखोल मंथन करण्यात आले. तसेच भारतीय संविधानाने दिलेले अधिकार, कायदेशीर तरतुदी आणि त्याबाबत जनजागृती कशी वाढवता येईल, यावरही विस्तृत चर्चा झाली. यावेळी केंद्र व राज्य शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनांचा लाभ समाजातील मागास व गरजू घटकांपर्यंत प्रभावीपणे कसा पोहोचवता येईल, यासाठी संघटनेने अधिक व्यापक पातळीवर काम करण्याची गरज व्यक्त करण्यात आली. समाजात जागृती निर्माण करून प्रत्येक पात्र नागरिकाला शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी संघटित प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
राष्ट्रीय सरचिटणीस सूफी मोहम्मद शफीक खान यांनी म्हटले कि, बैठकीदरम्यान सर्व पदाधिकाऱ्यांनी आपापले विचार व सूचना मांडल्या आणि मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनला देशभरात अधिक सक्षम, सक्रिय आणि जनसेवेसाठी समर्पित संघटना म्हणून बळकट करण्याचा संकल्प केला. राष्ट्रीय अध्यक्ष सलीम सारंग यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत संघटनेची एकजूट कायम ठेवत शिक्षण, सामाजिक जागरूकता आणि लोकसेवेच्या माध्यमातून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्य करण्याचे आवाहन केले.
या बैठकीस राष्ट्रीय उपाध्यक्ष व माजी मंत्री मोहम्मद निसार, राष्ट्रीय उपाध्यक्ष मोहिबुल्लाह खान, दिल्ली राज्याध्यक्ष सलीम अहमद, राष्ट्रीय महासचिव व प्रवक्ते सतवीर सिंह जाटव, राष्ट्रीय सरचिटणीस सूफी मोहम्मद शफीक खान, मुंबई जनरल सेक्रेटरी (नॉर्थ ईस्ट) सूफी गुलाम खान, पश्चिम उत्तर प्रदेश अध्यक्ष शमशाद हुसेन, मुरादाबाद मंडळाध्यक्ष मुशाहिद हुसेन, नासिर हुसेन, सय्यद मोहम्मद, सय्यद अन्वर, तसलीम खान, ॲड. सोहेल, मोहम्मद नवेद, डॉ. बी. डी. खान आणि मोहम्मद मेहरास यांच्यासह अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय पदाधिकारी उपस्थित होते.
0000
