रमेश औताडे
मुंबई : महामानव लहुजी उस्ताद साळवे आणि पिवळा रंग हे समीकरण म्हणजे या महामानवाची निशाणी आहे. तोच धागा पकडत लहुजी वस्ताद यांची निशाणी म्हणून “ लहू बंधन “ सर्व समाज बांधवांच्या हातात बांधण्याचा संकल्प साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने झाल्याने एका नवीन पर्वाची सुरवात झाली आहे. असे मत सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्य समन्वयक बाबुराव मुखेडकर यांनी साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती कार्यक्रमात व्यक्त केले.
अनेक लोक वेगवेगळ्या देवा धर्माच्या नावाने वेगवेगळ्या रंगाचे बंधन बांधतात. पिवळे बंधन हे मातंग समाजाच्या एकतेचे प्रतीक ठरेल असा संकल्प करत समाज बांधव संदीप नामवाड, संतोष थोरात, बाबुराव मुखेडकर यांनी राज्यभर समाज बांधवांच्या हातात हे पिवळे बंधन बांधून समाजाला एकत्र आणण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. या बंधनांमुळे समाज बांधवांमध्ये एक नवीन ऊर्जा चैतन्य निर्माण होईल.
सकल मातंग समाज च्या वतीने पुढील महिन्यात २९ सप्टेंबर रोजी मुंबई आझाद मैदान येथे तीव्र आंदोलनाची हाक दिली आहे. अंदोलनात सहभागी होण्यासाठी हे लहू बंधन बांधून समाजाच्या मागण्यांचे रणशिंग फुंकले जाणार आहे असे सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्य समन्वयक बाबुराव मुखेडकर यांनी सांगितले.
००००
