महिलांच्या आत्मनिर्भरतेसाठी शासन कटिबद्ध –  मेघना साकोरे-बोर्डीकर
रायगड-अलिबाग : महिलांना उद्योजक व आत्मनिर्भर बनवण्यासाठी राज्य शासन विविध योजना प्रभावीपणे राबवत असून प्रत्येक महिला लखपती व्हावी, हे सरकारचे उद्दिष्ट असल्याचे सार्वजनिक आरोग्य, पाणीपुरवठा, ऊर्जा, महिला व बालविकास तसेच सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी पनवेल येथे सांगितले. महसूल व वन विभागाच्या वतीने आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरा’त त्या बोलत होत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या शिबिराचे उद्घाटन राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते झाले. आमदार प्रशांत ठाकूर व अभिनेते-दिग्दर्शक पुष्कर श्रोत्री यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. शिबिरात जातीचा दाखला, उत्पन्न दाखला, सातबारा उतारा आदी महसूल विषयक कागदपत्रांचे जलद वितरण करण्यात आले. तसेच विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना लाभांचे वाटप करण्यात आले. राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी शेतकरी हा देशाचा अन्नदाता असून त्याच्या सक्षमीकरणासाठी तसेच तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील असल्याचे सांगितले. राज्यात १० लाख नागरिकांना लाभ देण्याचे उद्दिष्ट असताना, रायगड जिल्ह्यातच सव्वादोन लाखांहून अधिक नागरिकांना समाधान शिबिरांचा लाभ मिळाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. आमदार प्रशांत ठाकूर यांनी शासकीय योजना शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लोकप्रतिनिधी सातत्याने कार्यरत असल्याचे सांगितले. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी किशन जावळे, उपविभागीय अधिकारी पवन चांडक, तहसीलदार मिनल भामरे यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेकडो नागरिकांनी शिबिराचा लाभ घेत महसूल विषयक कामे तत्परतेने पूर्ण झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *