इंद्रेश कुमार व पाल्गा रिंपोचे यांचा ५ ऑगस्ट रोजी ‘राष्ट्रीय एकात्मिक समरसता सन्मान सोहळ्या’त गौरव
मुंबई | प्रतिनिधी दि-४ ऑगस्ट
लडाख येथे प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या ऐतिहासिक सिंधू महाकुंभात संपूर्ण देशात राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक समरसता, सर्वपंथ समभाव आणि भारतीय सांस्कृतिक ऐक्याचा प्रभावी संदेश दिला. या ऐतिहासिक उपक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक व अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य इंद्रेश कुमार तसेच बौद्ध आध्यात्मिक धर्मगुरू पाल्गा रिंपोचे यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी “राष्ट्रीय एकात्मिक समरसता सन्मान सोहळ्याचे” आयोजन करण्यात आले आहे. हा भव्य सन्मान सोहळा महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या पुढाकाराने आज सायंकाळी ४.०० ते ६.०० या वेळेत सचिवालय जिमखाना, विधान भवन शेजारी, मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा प्रमुख उपस्थिती म्हणून लाभणार असून, त्यांच्या हस्ते इंद्रेश कुमार आणि पाल्गा रिंपोचे यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
सिंधू महाकुंभाच्या माध्यमातून देशभरात राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक सलोखा आणि भारतीय संस्कृतीतील विविधतेतून एकतेचा संदेश प्रभावीपणे पोहोचविण्यात आला. सिंधू नदीच्या पवित्र तीरावर विविध धर्म, पंथ आणि संस्कृतींच्या प्रतिनिधींनी एकत्र येत राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेतली. बौद्ध आध्यात्मिक गुरू पाल्गा रिंपोचे यांच्या हस्ते संपन्न झालेले सिंधू पूजन आणि इंद्रेश कुमार यांच्या दीर्घकालीन प्रयत्नांमुळे या महाकुंभाला राष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक समरसता आणि सर्वपंथ समभावाचा संदेश अधिक व्यापकपणे पोहोचावा, या उद्देशाने हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश जनमानसात अधिक दृढ व्हावा, विविध धर्म-पंथांमध्ये परस्पर विश्वास आणि संवाद वाढावा तसेच भारतीय संस्कृतीतील “विविधतेत एकता” हा विचार अधिक बळकट व्हावा, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा “राष्ट्रीय एकात्मिक समरसता सन्मान सोहळा” महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
