अनिल ठाणेकर
ठाणे-जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत समग्र शिक्षा अभियानाच्या समावेशित शिक्षण विभागामार्फत पंचायत समिती भिवंडी मार्फत शेलार येथे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक बहुउद्देशीय संसाधन कक्ष (थेरपी सेंटर) नव्याने सुरू करण्यात आला. या केंद्राचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या थेरपी सेंटरमुळे परिसरातील दिव्यांग विद्यार्थ्यांना त्यांच्या गरजेनुसार विविध प्रकारच्या थेरपी, शैक्षणिक मार्गदर्शन आणि पुनर्वसन सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार असून त्यांच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी वैशाली डोंगरे या होत्या. प्रमुख उपस्थितीमध्ये जिल्हा परिषद ठाणेचे समावेशित शिक्षण (IE) जिल्हा समन्वयक अनिल कुऱ्हाडे, जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका देवयानी पाटील, शारदा विद्यालय, शेलारच्या मुख्याध्यापिका ज्योती पाटील, जगन्नाथ चोरगे, विष्णू पाटील, डॉ. विनायक पाटील, विषयतज्ज्ञ योगिता चौधरी, तालुका समन्वयक (समावेशित शिक्षण) निलम पिसाळ, शंकर मोकाशी, स्वाती जाधव, गायत्री भोपी, मनिषा गायकवाड, मेघा रणदिवे (विशेष शिक्षक) तसेच पालक, विद्यार्थी आणि शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी दिव्यांग विद्यार्थ्यांना वेळेवर आणि सातत्यपूर्ण थेरपी उपलब्ध होणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले. यापूर्वी विद्यार्थ्यांच्या पालकांना फिजिओथेरपी आणि ऑक्युपेशनल थेरपीसाठी दूरवर जावे लागत असल्याने वेळ, खर्च आणि गैरसोयींचा सामना करावा लागत होता. मात्र, शेलार येथील या अत्याधुनिक थेरपी सेंटरमुळे परिसरातील विद्यार्थ्यांना दर्जेदार फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, शैक्षणिक सहाय्य आणि पुनर्वसन सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार असून पालकांचा आर्थिक आणि मानसिक ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
या केंद्राच्या माध्यमातून दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, बौद्धिक, भाषिक, शारीरिक, मानसिक तसेच सामाजिक विकासाला निश्चितच चालना मिळेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला. प्रत्येक दिव्यांग विद्यार्थ्याला त्याच्या क्षमतेनुसार प्रगतीची संधी उपलब्ध करून देणे हे समग्र शिक्षेचे उद्दिष्ट असून हे केंद्र त्या दिशेने महत्त्वाचे पाऊल असल्याचेही त्यांनी नमूद केले. या उपक्रमाच्या यशस्वी उभारणीसाठी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे व उपशिक्षणाधिकारी (योजना) शुभांगी बढे यांचे मार्गदर्शन लाभले तसेच गटशिक्षणाधिकारी वैशाली डोंगरे, जिल्हा समन्वयक अनिल कुऱ्हाडे तसेच समावेशित शिक्षण विभागातील विशेष शिक्षकांनी घेतलेल्या सातत्यपूर्ण परिश्रमांचे यावेळी विशेष कौतुक करण्यात आले.
कार्यक्रमास ३७ दिव्यांग विद्यार्थी आणि त्यांच्या ४० पालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. उपस्थित पालकांनी या उपक्रमाचे स्वागत करत, हे थेरपी सेंटर त्यांच्या मुलांच्या विकासासाठी आशेचा किरण ठरेल आणि दर्जेदार उपचार व शैक्षणिक सहाय्य आता स्थानिक स्तरावर उपलब्ध होणार असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे नियोजन, सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन समग्र शिक्षेच्या समावेशित शिक्षण विभागातील विशेष शिक्षकांनी केले. संपूर्ण कार्यक्रम प्रेरणादायी आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
