अनिल ठाणेकर
ठाणे, ठाणे रिंग मेट्रो प्रकल्पाचे संपूर्ण भूसंपादन व इतर तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्यास हा प्रकल्प अवघ्या साडेतीन वर्षात पूर्ण करू, अशी ग्वाही बैठकीत व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी दिली. अडीच वर्षांत पुणे मेट्रोचे वेगाने काम करण्यात आले. त्याच धर्तीवर ठाण्याचे काम पूर्ण करता येईल, अशी आशा हर्डिकर यांनी व्यक्त केली. त्याचे आमदार ॲड. माधवी नाईक यांनी स्वागत केले आहे. ठाणे रिंग मेट्रो प्रकल्पाबाबत ठाण्यातील सामान्य नागरिकांच्या शंका व भीती थेट नागरिकांबरोबर संवाद साधून दूर केली जाणार आहे. भाजपच्या आमदार ॲड. माधवी नाईक यांच्या सूचनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रिंग मेट्रो मार्ग जाणाऱ्या विविध भागातील स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांबरोबर एकत्रपणे संवाद साधण्याच्या सूचना महामेट्रोच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील सह्याद्री विश्रामगृहात ठाणे शहरातील रिंग मेट्रो रेल्वेच्या कामाचा आढावा घेण्यासाठी बैठक घेण्यात आली. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, आमदार माधवी नाईक, आमदार निरंजन डावखरे, आमदार रवींद्र फाटक यांची उपस्थिती होती. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी बैठकीत लोकप्रतिनिधींना सविस्तर माहिती दिली.
ठाणे शहरातील वाढत्या लोकसंख्येनुसार रिंग मेट्रो प्रकल्प हा आवश्यक आहे. मात्र, या प्रकल्पाबाबत महामेट्रो, महापालिका किंवा कोणत्याही सरकारी आस्थापनांकडून सामान्य नागरिकांना कोणतीही माहिती दिली जात नाही. त्यामुळे या प्रकल्पाबाबत ठाणे शहरात गैरसमज निर्माण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील सामान्य नागरिक, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अभ्यासू व्यक्तींबरोबर चर्चा करण्याची आवश्यकता आहे. त्यांच्या शंकांचे समाधान करण्याची आवश्यकता आहे. रिंग मेट्रोच्या कामामुळे नुकसान होणार नसून, ठाणेकरांना फायदा होईल. या प्रकल्पाबाबत ठाणेकरांमध्ये विश्वास निर्माण करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे ठाण्यातील विविध भागात व नियोजित मेट्रोच्या स्थानकांच्या ठिकाणी परिसंवाद भरवावेत. त्यात महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी माहिती द्यावी, अशी सूचना आमदार अॅड. माधवी नाईक यांनी केली. त्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली. त्यानुसार लवकरच ठाणे शहरातील नागरिकांबरोबर थेट संवाद साधण्यासाठी परिसंवाद भरविले जाणार आहेत. तसेच गणेशोत्सवाच्या काळातही महामेट्रोकडून रिंग मेट्रोबाबत फलक लावण्यात येणार आहेत.
