अनिल ठाणेकर
ठाणे, पिकस्पर्धेचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने राबवण्याचे हे प्रथमच वर्ष असल्यामुळे, “एक वेळची विशेष बाब” म्हणून मूग व उडीद पिकासाठी अर्ज करण्यास १० ऑगस्ट २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून नवनवीन प्रयोग करण्यात येतात व उत्पादनात भर घातली जाते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती व मनोबल वाढून ते आणखी उमेदीने अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करतील. या उद्देशाची पूर्तता करण्यासाठी आणि प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता व गतिमानता आणण्यासाठी, खरीप हंगाम २०२६ पासून पीक स्पर्धेचे अर्ज स्वीकारण्यासाठी स्वतंत्र ऑनलाईन संगणक प्रणाली (Online Portal) सुरू करण्यात आली आहे. कृषी एकविभागामार्फत राज्यस्तरावर खरीप पीकस्पर्धा जाहीर करण्यात आली असून, सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी तालुकास्तरावरील पिकस्पर्धेत सहभाग घेता येईल. शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष शेतावरील उत्पादकता आधारभूत धरून तालुका, जिल्हा व राज्य स्तरावर विजेत्या शेतकऱ्यांची निवड केली जाईल. या स्पर्धेअंतर्गत खरीप हंगामातील एकूण ११ पिकांसाठी स्पर्धा घेतली जाणार आहे.
शासन निर्णयानुसार मूग व उडीद या पिकांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै ठरवण्यात आली होती. परंतु, पिकस्पर्धेचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने राबवण्याचे हे प्रथमच वर्ष असल्यामुळे, “एक वेळची विशेष बाब” म्हणून मूग व उडीद पिकासाठी अर्ज करण्यास १० ऑगस्ट २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या स्पर्धेत खालीलप्रमाणे एकूण ११ पिकांचा समावेश असून त्यांच्या अर्ज करण्याची अंतिम मुदत खालीलप्रमाणे आहे:
मूग व उडीद पीक : १० ऑगस्ट २०२६, भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमूग व सूर्यफूल : ३१ ऑगस्ट २०२६ स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावे जमीन असणे व ती जमीन तो स्वतः कसत असणे बंधनकारक आहे. शेतकरी एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत भाग घेऊ शकतात. तसेच सहभागी शेतकऱ्यांच्या स्वतःच्या शेतावर त्या पिकाखाली किमान ४० आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे. आवश्यक कागदपत्रे फार्मर आयडी, ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याची चलन पावती, जात प्रमाणपत्र (आदिवासी असल्यास), आणि बँक खाते चेक किंवा पासबुक डिटेल्स. पीकनिहाय सर्वसाधारण गटासाठी ३०० रुपये आणि आदिवासी गटासाठी १५० रुपये प्रवेश शुल्क निश्चित करण्यात आले आहे.
बक्षीस तपशील
तालुका पातळी: प्रथम ५,००० रुपये, द्वितीय ३,००० रुपये आणि तृतीय २,००० रुपये.
जिल्हा पातळी: प्रथम १०,००० रुपये, द्वितीय ७,००० रुपये आणि तृतीय ५,००० रुपये.
राज्य पातळी: प्रथम ५०,००० रुपये, द्वितीय ४०,००० रुपये आणि तृतीय ३०,००० रुपये.
कृषी विभागामार्फत सर्व शेतकरी बंधू-भगिनींना जास्तीत जास्त संख्येने या पिकस्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. इच्छूकांनी http://krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील पिकस्पर्धा टॅबवर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.
००००
