कल्याण: श्रीकृष्ण कला फाऊंडेशनच्या वतीने महात्मा गांधी विद्यालय, डोंबिवली येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या करपल्लवी गोंधळी लोककलेचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले. पूर्वप्राथमिक विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या अनोख्या लोककला सादरीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत शिवकालीन इतिहासाचा प्रेरणादायी अनुभव घेतला. करपल्लवी गोंधळी ही महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेतील अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि दुर्मीळ लोककला मानली जाते. धर्म, संस्कृती, इतिहास, शौर्य आणि राष्ट्रभक्तीचा संदेश लोकांपर्यंत पोहोचविणारे हे प्रभावी माध्यम असून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या काळात अशा लोककलांद्वारे समाजात जागृती, संघटन आणि स्वराज्यनिष्ठेची भावना वृद्धिंगत केली जात असल्याचे मानले जाते.
यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील मिणचे येथील छत्रपती संभाजीराजे शाहीरी पथकाचे शाहीर संजय जाधव मिणचेकर व शाहीर सामजी वाकसे मिणचेकर यांनी करपल्लवी गोंधळी लोककलेचे प्रभावी सादरीकरण केले. हातांच्या विशिष्ट मुद्रांद्वारे कथा उलगडत त्यांनी शिवकालीन पराक्रम, मावळ्यांचे शौर्य आणि स्वराज्याचा इतिहास विद्यार्थ्यांसमोर जिवंत केला. या गोंधळी कलापथकाचे वैशिष्ट्य म्हणजे ते सात भाषांमधून व्यक्तींची नावे ओळखून करपल्लवीच्या माध्यमातून सादर करतात. या अनोख्या सादरीकरणाने विद्यार्थी, पालक आणि उपस्थित नागरिक भारावून गेले. अनेक विद्यार्थी व पालकांनी स्वतःची नावे सांगितल्यानंतर कलाकारांनी हाताच्या मुद्रांद्वारे ती अचूक ओळखून दाखवत उपस्थितांची उत्स्फूर्त दाद मिळवली.
सादरीकरणादरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यनिर्मितीचा इतिहास, मावळ्यांचे शौर्य तसेच गुप्तहेर प्रमुख बहिर्जी नाईक यांच्या कार्याचा प्रभावी परिचय करून देण्यात आला. बहिर्जी नाईक यांच्या पराक्रमाच्या कथा आजही पोवाडे आणि गोंधळी परंपरेतून जतन होत असून, त्यांचे योगदान नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा हा उपक्रम विशेष ठरला. या कार्यक्रमाची संकल्पना व संयोजन श्रीकृष्ण कला फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले. मंत्रालय प्रतिनिधी कृष्णात कदम तसेच जगन्नाथ कदम कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होते. विद्यालयाचे कार्यवाह दिलीप झरकर, नितीन मांडे, जयराम महाजन यांनी उपस्थित राहून कलाकारांचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक अजयकुमार जोगी यांनी केले. कार्यक्रमामागील भूमिका कृष्णात कदम यांनी मांडली, तर सूत्रसंचालन ललिता कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालकांचे मोलाचे सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाविषयी अभिमान, संस्कृतीबद्दल जिव्हाळा आणि राष्ट्रभक्तीची प्रेरणा जागविणारा हा उपक्रम उपस्थितांच्या मनावर कायमस्वरूपी ठसा उमटवून गेला.
००००००
