ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथे सर्जरी विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांनी एका २० वर्षीय महिला रुग्णाच्या पोटातील सुमारे साडेआठ किलो वजनाचा दुर्मिळ ट्युमर यशस्वीरित्या शस्त्रक्रियेद्वारे काढण्यात आला असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. स्वप्नाली कदम यांनी दिली. गेल्या सहा महिन्यांपासून एक महिला पोटाच्या आजारावर उपचार घेण्यासाठी रुग्णालयात येत होती. तिला पोटाच्या डाव्या बाजूस वेदना तसेच पोट फुगण्याचा त्रास होत होता. तपासणीनंतर तिच्या पोटाच्या डाव्या बाजूचा भाग ओटीपोटापासून वरच्या उदरापर्यंत मोठ्या गाठीने व्यापलेला असल्याचे निदर्शनास आले. सीटी स्कॅनमध्ये सुमारे दीड फूट लांब व एक फूट रुंद आकाराची गाठ असल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे, या गाठीचा इतर अवयवांवर परिणाम झालेला नव्हता. रुग्णालयाच्या सर्जरी विभागातील डॉक्टरांनी अत्यंत गुंतागुंतीच्या ठिकाणी असलेली ही साडेआठ किलो वजनाची गाठ यशस्वीरित्या काढली, सदरची शस्त्रक्रिया नुकतीच पार पडली.
ही शस्त्रक्रिया डॉ. वर्षा पाटील, डॉ. क्षितीज माने, डॉ. शुभम मोरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. अरुण माने यांनी शस्त्रक्रियेसाठी मार्गदर्शन केले. भूलतज्ज्ञ विभागाचे प्रमुख डॉ. विजय पाटील व डॉ. केतकी पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. संजना पाटील यांनी रुग्णाला यशस्वीपणे भूल दिली. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. स्वप्नाली कदम आणि अधीक्षक डॉ. अनिरुद्ध माळगावकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाच्या प्रकृतीत समाधानकारक सुधारणा झाली असून गाठ काढल्यानंतर तिचे वजन सुमारे सहा ते सात किलोने कमी झाले आहे.
वैद्यकीय तज्ज्ञांच्या माहितीनुसार, पोटाच्या मागील भागात (रेट्रोपेरिटोनियल भागात) एवढ्या मोठ्या आकाराच्या गाठी अत्यंत दुर्मिळ असतात. मूत्रपिंड, मोठ्या रक्तवाहिन्या, स्वादुपिंड यांसारख्या महत्त्वाच्या अवयवांच्या जवळ अशा गाठी असल्यामुळे शस्त्रक्रिया करणे अत्यंत आव्हानात्मक असते. अशा गुंतागुंतीच्या परिस्थितीत ही शस्त्रक्रिया छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील डॉक्टरांनी यशस्वीपणे पार पाडली असल्याचे अधिष्ठाता डॉ. स्वप्नाली कदम यांनी नमूद केले.
००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *