महायुतीत भाजपा शिवसेना आमने सामने
मिरा-भाईंदर: मिरा-ईंदर शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या प्रश्नावरुन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलेल्या आरोपांना आमदार नरेंद्र मेहता यांनी प्रत्युत्तर देत अनेक मुद्द्यांवर आपली भूमिका पत्रकार परिषदेत स्पष्ट केली. शहरातील अंतर्गत रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी मिरा भाईंदर महापालिकेची आहे. महापालिका हद्दीत फाउंटन ते गायमुख हा राज्य महामार्ग म्हणून शासनाच्या आधीन येतो तर वर्सोवा ते दहिसर चेक नाका हा रस्ता केंद्र सरकारच्या ताब्यात आहे. त्यामुळे राज्य शासन व केंद्र शासनाची त्या रस्त्याची देखभाल,दुरुस्तीची जबाबदारी आहे. मात्र प्रताप सरनाईक जनतेची दिशाभूल करत चुकीचे आरोप पालिका प्रशासनावर करत आहेत.
२०२४ मध्ये राज्यात आमचे सरकार नसताना व महापालिकेत प्रशासकीय राजवट कार्यकाळात मंत्री प्रताप सरनाईक यांनी तात्कालीन आयुक्त संजय काटकर यांना हाताशी धरून राज्य महामार्ग फाउंटन ते गायमुख हा रस्ता महापालिकेकडे वर्ग करून घेतला. त्यावेळी या चार किलोमीटरच्या रस्त्यासाठी महापालिकेकडून ८ कोटी इतका खर्च देखभाल दुरुस्तीसाठी करण्यात आला.पालिका हद्दीतील रस्ते देखभाल दुरुस्तीसाठी पालिका प्रशासनाकडे पैसे नाहीत. त्यात राज्याच्या अधीन येणारा रस्ता पालिका प्रशासनाने का दुरुस्त करावा असा प्रश्न मेहता यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.
राज्य सरकारने पालिका प्रशासनाला पैसे द्यावे आम्ही तो रस्ता बनवू असे त्यांनी सांगितले.मुंबई, ठाणे, नाशिक आणि नागपूरकडे जाणाऱ्या वाहनांची मोठी वाहतूक या मार्गावरून होत असल्याने या रस्त्यावर अतिरिक्त ताण येत असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रताप सरनाईक त्या भागाचे चार वेळेचे आमदार आहेत.आज पर्यंत त्यांनी सदरचा रस्ता बनवून घेतला नाही. मात्र स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या ५० बंगल्याच्या प्रोजेक्ट करता कोट्यवधी रुपये खर्च करून रस्ता बनवण्यात आला आहे. गायमुख व फाउंटन चा रस्ता का आठवला नाही? हे पैसे या रस्त्याला का मंत्री सरनाईक यांनी वापरले नाही असा प्रश्न मेहतांनी उपस्थित केला.
शहरातील अंतर्गत रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण करणे कामी महापालिकेला आवश्यक निधीची गरज असल्याने शासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर १७ नोव्हेंबर २०२२ रोजी शासनाने मंजुरी दिली आहे. त्या अनुषंगाने ५०० कोटी रुपयांचे कर्ज,इंडियन बँक या राष्ट्रीयकृत बँकेने मंजूर केले आहे. मात्र त्याला शासनाची मंजुरी अद्यापही प्राप्त झाली नाही. महापालिकेकडून वारंवार पाठपुरावा केल्यानंतर मंत्री प्रताप सरनाईक यांच्या दबावापोटी मंजुरी मिळत नसल्याचा आरोप मेहता यांनी केला. राज्य शासनाने तात्काळ मंजुरी द्यावी अन्यथा राज्य सरकारच्या निदर्शनास आणून देण्यासाठी येत्या सोमवारी १० ऑगस्ट सकाळी ११ वाजता फाउंटन हॉटेल या रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा आमदार नरेंद्र मेहता यांनी दिला आहे.
आमदार नरेंद्र मेहता यांनी मंत्री सरनाईक यांना ओपन चॅलेंज दिलं आहे की,स्वतःच्या मार्फत उद्घाटन करण्यात आलेल्या भाईंदर पश्चिमच्या उत्तन परिसरातील प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे काम कधी पर्यंत पूर्ण होणार, की फक्त जनतेला आश्वासन देऊन दिशा भूल करणार. सदर उद्घाटनाला आता एक वर्ष पूर्ण होणार आहे. मात्र कोणत्याही प्रकारचं काम त्या ठिकाणी झालेले दिसत नाही.त्यामुळे काम कधी पूर्ण होणार याबाबत जनतेला मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगावे असे मेहता यांच्या कडून सांगण्यात आले आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सविस्तर पत्र पाठवून या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. मौजे वरसावे येथील सर्व्हे क्रमांक ३४-ब मधील आरसीसी पुलाच्या कामाला मे. सेव्हन इलेव्हन हॉटेल्स प्रा. लि. आणि त्यांचे संचालक आमदार नरेंद्र मेहता यांच्याकडून अडथळा निर्माण केला जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी पत्रात केला आहे.
सरनाईक यांनी पत्रात म्हटले आहे की, मुंबईलगत झपाट्याने विकसित होणाऱ्या मिरा-भाईंदर शहराची लोकसंख्या १५ लाखांच्या पुढे गेली असून शहरास सर्वाधिक भेडसावणारा प्रश्न म्हणजे पिण्याच्या पाण्याचा आहे. या प्रश्नावर कायमस्वरूपी उपाय म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली १० जुलै २०१७ रोजी सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा प्रकल्प आणि मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले होते. राज्य सरकार कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून नागरिकांसाठी मूलभूत सुविधा उभारत असताना काही व्यक्ती स्वतःच्या व्यावसायिक हितासाठी विकासकामांना अडथळा निर्माण करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.
००००
सामाजिक समरसता आणि भारतीय संस्कृतीच्या चिरंतन मूल्यांचा सन्मान असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक समरसता आणि सर्वधर्म समभावाचा संदेश देणारा हा सोहळा उपस्थितांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *