केडीएमसीच्या ढिसाळ कारभाराने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
कल्याण : टिटवाळ्यातील हरी ओम व्हॅली सोसायटीजवळील ओम संकुल परिसरात कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभाराचा आणखी एक नमुना समोर आला आहे. विवेकानंद इंग्लिश हायस्कूलच्या भिंतीलगत पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी महापालिकेने भला मोठा खड्डा खोदून ठेवला असून, या धोकादायक कामामुळे शाळकरी विद्यार्थी, पालक आणि स्थानिक नागरिकांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, या ठिकाणापासून अगदी लगतच गटार उपलब्ध असतानाही पावसाचे पाणी त्यामध्ये वळविण्याऐवजी रस्त्यालगत खोल खड्डा खोदण्यात आल्याने प्रशासनाच्या नियोजनशून्य आणि बेफिकीर कारभारावर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
या मार्गावरून दररोज शेकडो विद्यार्थी शाळेत ये-जा करतात. त्याचबरोबर पालक, ज्येष्ठ नागरिक आणि परिसरातील रहिवाशांचीही मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. पावसाळ्यात या खड्ड्यात पाणी साचल्याने त्याची खोली लक्षात येत नाही. त्यामुळे एखादा विद्यार्थी, पालक किंवा दुचाकीस्वार या खड्ड्यात पडून गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अपघात घडल्यास त्याची जबाबदारी कोण स्वीकारणार, असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, काम सुरू करताना कोणतीही सुरक्षितता उपाययोजना करण्यात आलेली नाही. खड्ड्याभोवती संरक्षक कठडे, इशारा फलक किंवा रात्री परावर्तित होणारी सुरक्षा व्यवस्था नसल्याने हा परिसर अधिक धोकादायक बनला आहे. शाळा सुरू असताना विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोपही स्थानिकांनी केला आहे.
याबाबत संबंधित अधिकारी हरून इनामदार यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता, “करतो… पाहतो… माणूस पाठवतो…” अशी उडवाउडवीची उत्तरे देण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. मात्र, प्रत्यक्षात अद्याप कोणतीही दुरुस्ती अथवा सुरक्षिततेची उपाययोजना करण्यात आलेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
दरम्यान, हा धोकादायक खड्डा तातडीने बुजवून पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा करण्यासाठी शाश्वत व्यवस्था करावी, तसेच या निष्काळजीपणासाठी जबाबदार अधिकारी आणि संबंधित कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी खेळणाऱ्या अशा प्रकारांना वेळीच आळा घालण्याची गरज व्यक्त करत, “प्रशासनाला जाग येण्यासाठी एखादा निष्पाप जीव गमवावा लागणार आहे का?” असा संतप्त प्रश्न परिसरातील नागरिक उपस्थित करत आहेत.
०००००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *