नवी मुंबई : मतदारयादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमांतर्गत गणनापत्र (Enumeration Form) दाखल करण्याची मुदत भारत निवडणूक आयोगाने ८ ऑगस्टवरून १७ ऑगस्ट २०२६ पर्यंत वाढविली आहे. त्यामुळे मतदारांना आता १७ ऑगस्टपर्यंत संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याकडे गणनापत्र सादर करता येणार आहे.
१ ऑक्टोबर हा पात्रता दिनांक गृहीत धरून विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम ३० जूनपासून सुरू आहे. बीएलओमार्फत गणनापत्रांचे वितरण, संकलन आणि डिजिटलायझेशनचे काम सुरू असून, सुधारित वेळापत्रकानुसार मतदान केंद्रांचे पुनर्रचनाकरण आणि पुनर्व्यवस्थापनही १७ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेवर महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्याकडून बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.
सुधारित वेळापत्रकानुसार प्रारूप मतदारयादीचे प्रकाशन २४ ऑगस्ट करण्यात येईल. त्यानंतर २४ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर या कालावधीत दावे व हरकती स्विकारल्या जातील. प्राप्त दावे-हरकतींची सुनावणी व निकाली काढण्याची प्रक्रिया २४ ऑगस्ट ते २२ ऑक्टोबर दरम्यान पार पडेल. अंतिम मतदारयादी २७ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. आतापर्यंत १५० ऐरोली विधानसभा मतदारसंघात ४ लाख ९७ हजार ३८० मतदारांपैकी ४ लाख ५९ हजार १५३ गणनापत्रांचे वितरण करण्यात आले असून, २ लाख २३ हजार ८०८ गणनापत्रे भरून प्राप्त झाली आहेत. त्यांचे डिजिटलायझेशन पूर्ण झाले आहे.
तर १५१ बेलापूर विधानसभा मतदारसंघात ४ लाख २२ हजार ३१७ मतदारांपैकी ४ लाख १० हजार ८६३ गणनापत्रांचे वितरण झाले असून, २ लाख १८ हजार २८ गणनापत्रे बीएलओंकडे जमा झाली आहेत. या अर्जांचे डिजिटलायझेशनही पूर्ण करण्यात आले आहे. गणनापत्र न भरल्यास नाव प्रारूप मतदारयादीतून वगळले जाणार निवडणूक प्रशासनाने नागरिकांना इशारा दिला आहे की, १७ ऑगस्टपर्यंत गणनापत्र भरून बीएलओंकडे जमा न केल्यास संबंधित मतदाराचे नाव प्रारूप मतदारयादीतून वगळले जाऊ शकते.
सन २००२ च्या मतदारयादीत स्वतःचे किंवा पालकांचे नाव आढळले नाही, तरीही नागरिकांनी गणनापत्रातील कॉलम क्रमांक ३ मध्ये सध्याची माहिती भरून स्वाक्षरी करावी आणि निवडणूक आयोगाने मान्य केलेल्या कागदपत्रांपैकी एक कागदपत्र जोडून बीएलओंकडे अर्ज सादर करावा. अन्यथा मतदारयादीत नाव पुन्हा समाविष्ट करण्यासाठी फॉर्म-६ भरून संपूर्ण प्रक्रिया नव्याने करावी लागेल.
नागरिकांच्या सोयीसाठी ऐरोली आणि बेलापूर विधानसभा मतदारसंघातील संबंधित बीएलओंची माहिती समाजमाध्यमांवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा नवी मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांनी नागरिकांना अंतिम मुदतीची वाट न पाहता गणनापत्र तातडीने भरून बीएलओंकडे जमा करण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *