डोंगरी पोलिसांची मोठी कारवाई
दिनेश मराठे
मुंबई : डोंगरी पोलिसांनी बिबट्या या संरक्षित वन्यजीव प्राण्याच्या कातडीची बेकायदेशीर विक्री करण्याच्या उद्देशाने आलेल्या इसमास ताब्यात घेऊन गुन्हा दाखल त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.या संदर्भात डोंगरी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार डोंगरी पोलीस ठाणे हद्दीमध्ये बिबट्या या संरक्षित वन्यजीव प्राण्याची कातडी विक्री करण्याच्या उद्देशाने एक इसम येणार असल्याची खात्रीशीर माहिती प्राप्त झाली होती.या माहितीच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक बाळासाहेब कानवडे यांच्या नेतृत्वाखाली, पोलीस उपनिरीक्षक सुनील रणदिवे, पोलीस हवालदार विशाल सोनवणे व पोलीस कॉन्स्टेबल सुरज धायगुडे यांचे पथक तयार करण्यात आले.सदर पथकाने प्राप्त माहितीची खातरजमा करून नियोजनबद्ध, कौशल्यपूर्ण पद्धतीने कारवाई केली. ९ ऑगस्टला निखिल सोनावणे (रा.ताडदेव) मुंबई या इसमास ताब्यात घेतले.त्याच्या ताब्यातून बिबट्या या वन्यजीव प्राण्याच्या कातडीसदृश वस्तूचे जप्ती करण्यात आली. सदर कातडीचे अंदाजे वजन २ किलो ५०० ग्राम असून, तिची अंदाजे किंमत तीस लाख रुपये असल्याचे प्राथमिकदृष्ट्या नमूद करण्यात आले आहे. सदर कातडीची प्रजाती व अधिकृत किंमत सक्षम वनविभाग/वन्यजीव तज्ज्ञांकडून निश्चित करून घेण्यात येत आहे.सदर प्रकरणी वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ मधील कलम २, ९, ३९(२),(३), ५१, ५२ या लागू तरतुदींनुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून, प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील रणदिवे यांचेकडून करण्यात येत आहे.सदर गुन्ह्यात बिबट्याची कातडी कोणाकडून प्राप्त झाली, तिची विक्री/खरेदी करण्यामागे कोण व्यक्ती सहभागी आहेत, आर्थिक व्यवहार झाला आहे काय, तसेच या वन्यजीव तस्करीमध्ये अन्य कोण व्यक्तींचा सहभाग आहे काय, याबाबत पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *