मनोज प्रधान यांचा ठाण्यातील आमदारांवर घणाघात
अनिल ठाणेकर
ठाणे – ठाणेकरांची मागणी नसताना सत्ताधाऱ्यांनी रिंग मेट्रो प्रकल्प लादला आहे. सोशल मिडीयावर १०० टक्के लोक विरोध करीत आहेत. असे असताना, शहराचे प्रतिनिधीत्व करणारे तीन आमदार,  “हा प्रकल्प फेस्टिव्हल होणार नाही म्हणून पुढे सरकवा; सोसायटीच्या दारात स्टेशन नको म्हणून २०० मीटर पुढे न्या; कळवा- मुंब्रा येथे प्रकल्प न्या”, असे सल्ले देत आहेत. हा प्रकल्प म्हणजे भातुकलीचा खेळ आहे का? अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी आमदारांवर टीकास्त्र सोडले आहे. जर तुम्ही एखाद्या विदूषकाला निवडून दिले, तर सर्कसचीच अपेक्षा करा!, असा टोलाही प्रधान यांनी लगावला आहे.
मनोज प्रधान यांनी रिंग मेट्रो रेल्वेला सुरूवातीपासूनच विरोध केला आहे. कोट्यवधी रूपये खर्च करून उभारला जाणारा हा प्रकल्प ठाणे शहराच्या मूळावर उठणार आहे, असे प्रधान यांनी सप्रमाण पटवून दिले आहे. त्यावर ठाणे शहरातील तीन आमदारांनी तीन अव्यवहार्य सूचना केल्या आहेत. त्यावर प्रधान यांनी टीकेचा सूर आळवला आहे.
प्रधान यांनी सांगितले की,  रिंग रेल्वेचा प्रकल्प हा ठाणे शहरासाठी जाहीर करण्यात आला आहे.  १२,२०० कोटी रुपये खर्च करून हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. मात्र, आपला पहिला प्रश्न आहे की,  हा प्रकल्प मागितला कुणी? ठाण्यातील कुठल्या नागरिकाला हा रिंग रेल्वे प्रकल्प पाहिजे?  सोशल मीडियावर बघितलं, तर १०० पैकी १०० कमेंट्स ह्या प्रकल्पाच्या विरोधात जातात. त्याचे कारण आहे की, मेट्रो लाइन चार आणि मेट्रो लाइन पाच गेले १० वर्ष चालू करू शकलेले नाहीत. आता ही नवीन रिंग रेल्वे तुम्ही सुरू करताय.
आपण सुरूवातीलाच १,००० कोटी रुपयांच्या इलेक्ट्रिक बसेस घ्या आणि लास्ट माईल कनेक्टिव्हिटी करा, पण आपल्या सत्ताधाऱ्यांना त्यावर काहीच  बोलायचे नाही. काही ठाणेकर या प्रकल्पाला विरोध करीत असले तरी एका सोसायटीचे लोक,  आमच्या समोर स्टेशन नको, २०० मीटर पुढे स्टेशन घेऊन जा. दुसरे सोसायटी वाले सांगतात, या रस्त्यावर नका घेऊ, मागच्या रस्त्यावर नेऊन घ्या, असे म्हणत आहेत.
हा अतिशय चुकीचा पायंडा पडतोय. १२,२०० कोटीच्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही एक तर लोकांच्या सूचना – हरकती घेतल्याच नाहीत. लोकांना हा प्रकल्पच नको आणि भातुकलीसारखा खेळ सुरू केलाय. आमचा विकासाला विरोध नाही. मात्र, नियोजनशून्य विकास आम्हाला मान्य नाही.हा प्रकल्प राबविताना जे नियोजन करायचे होते ते करण्यात आलेले नाही. त्यामुळे हा प्रकल्प राबवित असताना प्रचंड वाहतूक कोंडी होणार आहे. हा प्रकल्प २०२९ मध्ये पूर्ण होणार असल्याच्या वल्गना केल्या जात असल्या तरी २०३५ पूर्वी हा प्रकल्प पूर्ण होणे शक्यच नाही. त्यातल्या त्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानायला हवेत. कारण, त्यांनी नागरिकांच्या सुचना – हरकती – सल्ले घेऊ, असे म्हटले आहे. त्यांच्या या भूमिकेचे स्वागतच आहे. परंतु, सुचना , हरकती येण्याआधीच जर कामे सुरू असतील तर फायदा कसा काय होणार?  त्यामुळे नागरिकांच्या हरकती, सुचना स्वीकारून त्यावर साधक – बाधक चर्चा झाल्याशिवाय प्रकल्पाचे कामच सुरू करू येऊ नये,  तसेच मेट्रो लाइन चार आणि मेट्रो लाइन पाच पूर्ण कार्यन्वित झाल्याशिवाय रिंग मेट्रोचा विचार  करू नये, अशी आमची मागणी असल्याचेही प्रधान यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *