लाला लजपतराय विधी महाविद्यालयाचा उपक्रम
मुंबई, २२ ऑगस्ट २०२६ : महालक्ष्मी येथील लाला लजपतराय कॉलेज ऑफ लॉ यांच्यावतीने लाला लजपतराय कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स यांच्या सहकार्याने “भारतातील नवीन फौजदारी न्यायव्यवस्था : बी. एन. एस., बी. एन. एस. एस. आणि बी. एस. ए., २०२३ – फौजदारी तपास व खटल्यांमध्ये फॉरेन्सिक पुरावे आणि वैज्ञानिक पद्धतींचे एकत्रीकरण” या विषयावर महत्त्वपूर्ण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेला विद्यार्थी व प्राध्यापकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विवा कॉलेज ऑफ लॉ येथील विद्यार्थी व प्राध्यापकांनीही सहभाग नोंदवल्याने या उपक्रमाला आंतर-संस्थात्मक स्वरूप प्राप्त झाले.
या कार्यशाळेस नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी (एन.एफ. एस. यू.) येथील डिपार्टमेंट ऑफ लॉ, फॉरेन्सिक जस्टिस अँड पॉलिसी स्टडीजच्या डॉ. नवतिका सिंह नौटियाल यांनी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन केले. आपल्या मार्गदर्शनात त्यांनी भारतीय न्याय संहिता (बी. एन. एस.), भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बी. एन. एस. एस) आणि भारतीय साक्ष्य अधिनियम (बी. एस. ए.), २०२३ या नवीन फौजदारी कायद्यांमुळे झालेल्या महत्त्वपूर्ण बदलांवर प्रकाश टाकला. विशेषतः फौजदारी तपास आणि न्यायालयीन खटल्यांमध्ये फॉरेन्सिक पुरावे, वैज्ञानिक तपासपद्धती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यावर त्यांनी मार्गदर्शन केले.
कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना बदलत्या फौजदारी कायद्यांची तसेच आधुनिक न्यायव्यवस्थेमध्ये वैज्ञानिक तपास आणि फॉरेन्सिक तंत्रज्ञानाच्या वाढत्या महत्त्वाची माहिती मिळाली. कार्यशाळेनंतर आयोजित संवादात्मक प्रश्नोत्तरे सत्रात विद्यार्थ्यांनी तज्ज्ञ मार्गदर्शकाशी थेट संवाद साधत फॉरेन्सिक पुरावे, वैज्ञानिक तपास आणि फौजदारी खटल्यांशी संबंधित विविध व्यावहारिक बाबी समजून घेतल्या.
लाला लजपतराय कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स यांच्या सहकार्याने आणि विवा कॉलेज ऑफ लॉच्या सहभागामुळे या उपक्रमाला शैक्षणिक देवाणघेवाण, आंतरविषयक अध्ययन आणि ज्ञानविनिमयाचे प्रभावी व्यासपीठ प्राप्त झाले. विविध संस्थांतील विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या सहभागामुळे कार्यशाळेची शैक्षणिक उपयुक्तता अधिक वृद्धिंगत झाली.
कार्यक्रमाची सुरुवात स्वागतपर भाषण, राष्ट्रगीत आणि राज्यगीताने झाली. त्यानंतर दीपप्रज्वलन करून श्री. लाला लजपतराय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. तज्ज्ञ मार्गदर्शकांचा सत्कार व परिचय करून दिल्यानंतर मुख्य शैक्षणिक सत्रास सुरुवात झाली. कार्यक्रमाचा समारोप औपचारिक आभार प्रदर्शनाने करण्यात आला. कार्यशाळेचे आयोजन डॉ. केवल उके, प्राचार्य, लाला लजपतराय कॉलेज ऑफ लॉ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. असि. प्रो. दीपक पवार यांनी प्राध्यापक प्रभारी म्हणून कार्यक्रमाचे समन्वयन केले.
या कार्यशाळेच्या माध्यमातून कायदेविषयक शिक्षण, फॉरेन्सिक विज्ञान आणि समकालीन फौजदारी न्यायव्यवस्था यांचा प्रभावी संगम घडवून आणण्यात आला. नवीन फौजदारी कायद्यांच्या पार्श्वभूमीवर विकसित होत असलेल्या तपास, वैज्ञानिक पुरावे आणि न्यायालयीन प्रक्रियेच्या बदलत्या चौकटीची विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण माहिती या उपक्रमातून मिळाली.
0000
