काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची महायुती सरकारवर जोरदार टीका
हरिभाऊ लाखे
नाशिक : राज्यात पुणे, नाशिक, वर्धा, पालघरसह अनेक ठिकाणी आदिवासी विद्यार्थ्यांचे उपोषण काही दिवसापासून सुरु आहे. राज्यातील महायुती सरकारकडून विकासाच्या गप्पा केल्या जातात. परंतु, आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्यास त्यांना वेळ नाही. विद्यार्थ्यांनी आदिवासी विकास मंत्र्यांची भेट घेतल्यावर आपल्याकडून काही होणार नसल्याने मुख्यमंत्र्यांना भेटा, असा सल्ला दिला जातो. मुख्यमंत्र्यांना या उपोषणाची दखल घेण्यास वेळ नाही. अशा लोकांना पदावर राहण्याचा अधिकार नाही, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
येथे ईदगाह मैदानावर विविध मागण्यांसाठी उपोषणास बसलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी भेट घेतली. यावेळी खासदार डॉ. शोभा बच्छाव, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सपकाळ यांनी, आदिवासी विभागात भ्रष्टाचार बोकाळला असून विद्यार्थ्यांना कोणत्याच सुविधा दिल्या जात नसल्याचा आरोप केला. काही दिवसांपासून विद्यार्थ्यांचे उपोषण सुरु आहे. परंतु, महायुती सरकारच्या एकाही मंत्र्याला त्यांची दखल घ्यावी, असे वाटले नाही.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी याप्रश्नी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले. उपोषणाला बसलेल्या विद्यार्थ्यांना काही झाल्यास त्याची सर्व जबाबदारी सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची असेल, असा इशाराही त्यांनी दिला. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके हे राहुल गांधी यांना आदिवासींच्या प्रश्नांची अद्ययावत माहिती नसल्याचे सांगतात. परंतु, तुम्ही ज्या विभागाचे मंत्री आहात, त्याची माहिती तरी तुम्हाला आहे का, असा प्रश्न सपकाळ यांनी उपस्थित केला. वैद्यकीय तपासणीच्या नावाखाली विद्यार्थिनी गरोदर आहे की नाही, याची तपासणी केली जात असल्याचा प्रश्न आहे. मंत्री त्यावर उत्तर न देता दुसऱ्याच प्रश्नावर बोलत आहेत, असा आरोपही सपकाळ यांनी केला.
गोल्फ क्लब मैदानावर आदिवासी विद्यार्थी संघटनेचे काही दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. या आंदोलकांशी सपकाळ यांनी संवाद साधला. आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर नाशिक केंद्रबिंदू मानत या ठिकाणी राज्यातील सर्व विद्यार्थी संघटना एकत्र येत एक सप्टेंबर रोजी आंदोलन करणार आहेत. आंदोलकांच्या पाठीशी काँग्रेस कायम राहील, असे आश्वासन सपकाळ यांनी दिले.
0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *