अनिल ठाणेकर
ठाणे, ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील कळवा-ब्रा परिसरातील विविध विसर्जन घाटांवर दरवर्षी गणेशमूर्ती व देवीमूर्ती विसर्जनाची सेवा करणाऱ्या स्थानिक भूमिपुत्रांना विमा संरक्षण, मानधन तसेच आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ठाणे शहर (जिल्हा) अध्यक्ष व ठाणे महापालिकेचे नगरसेवक नजीब मुल्ला यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली आहे.
याबाबत २४ ऑगस्ट २०२६ रोजी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात मुल्ला यांनी म्हटले आहे की, ठाणे महापालिका क्षेत्रातील कळवा-मुंब्रा परिसरातील विविध विसर्जन घाटांवर दरवर्षी ठाणे, कळवा, मुंब्रा तसेच मुंबई उपनगर आणि आजूबाजूच्या परिसरातून हजारो गणेशमूर्ती व देवीमूर्तींचे विसर्जन करण्यात येते. विशेषतः रेतीबंदर विसर्जन घाटावर गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक भूमिपुत्र निःशुल्कपणे विसर्जनाची सेवा बजावत आहेत.
गणेशमूर्ती व देवीमूर्तींचे विसर्जन करताना अनेकदा मोठ्या व वजनदार मूर्ती पाण्यात नेण्याचे काम करावे लागते. त्यामुळे या युवकांना मोठी जोखीम पत्करावी लागते. त्यांच्या सुरक्षेसाठी पुरेशी सुरक्षा साधने, बचाव पथक, वैद्यकीय सुविधा किंवा विमा संरक्षण उपलब्ध नसल्याने दुर्घटना घडल्यास संबंधित युवकांच्या कुटुंबीयांसमोर गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर गेली अनेक वर्षे निःस्वार्थपणे सेवा बजावणाऱ्या स्थानिक भूमिपुत्रांना अपघाती विमा संरक्षण, आवश्यक सुरक्षा साहित्य, लाईफ जॅकेट, वैद्यकीय सुविधा तसेच पिण्याचे पाणी, नाश्ता आणि जेवणाची व्यवस्था महापालिकेच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच या युवकांनी बजावलेल्या सेवेला योग्य मोबदला म्हणून ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून त्यांना योग्य मानधन देण्यात यावे, त्यांच्या योगदानाची दखल घेऊन प्रशस्तिपत्र देण्यात यावे, अशीही मागणी नजीब मुल्ला यांनी केली आहे.
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रेतीबंदर तसेच इतर विसर्जन घाटांवरील स्थानिक भूमिपुत्रांच्या सुरक्षेचा आणि त्यांच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न तातडीने सोडवावा, तसेच याबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी विनंती त्यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. स्थानिक भूमिपुत्रांची सेवा ही केवळ परंपरा नसून ठाणे शहराच्या गणेशोत्सवातील महत्त्वाची सामाजिक जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेसोबतच त्यांच्या श्रमांचा सन्मान करणे ही महापालिकेची जबाबदारी आहे, अशी भूमिका या निवेदनातून मांडण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *