विद्यार्थ्यांना सर्पसंवर्धनाचा संदेश
ठाणे-नवभारत हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, भरणे येथे विद्यार्थ्यांसाठी ‘साप, सापांचे जीवन आणि सापांविषयीच्या अंधश्रद्धा’ या विषयावर प्रबोधनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात होते .यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य पदाधिकारी सचिन गोवळकर, जिल्हा कार्याध्यक्ष नंदलाल शिंदे, वैज्ञानिक जाणीवा प्रमुख नियती गोवळकर, भिकू गोवळकर हायस्कूलचे शिक्षक उपस्थित होते
यावेळी उपस्थित विद्यार्थीना नियती गोवळकर यांनी, साप हा शेतकऱ्यांचा मित्र आहे. शेतातील उंदीर साप खात असतो. सर्वच साप विषारी नसतात. सापांच्या विविध प्रजाती, त्यांचे अधिवास, सापांचे पर्यावरणातील महत्त्व, विषारी व बिनविषारी साप यांतील फरक तसेच सर्पदंश झाल्यास घ्यावयाची काळजी याबाबत विद्यार्थ्यांना वैज्ञानिक माहिती दिली
सापांविषयी समाजात प्रचलित असलेल्या विविध अंधश्रद्धा, गैरसमज आणि भीती यांचे वैज्ञानिक दृष्टिकोनातून खंडन करण्यात आले. साप हा मानवाचा शत्रू नसून पर्यावरणातील महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे साप दिसल्यास घाबरून किंवा त्याला मारण्याऐवजी योग्य पद्धतीने त्याची सुटका करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले.
आज ही भारतात साप चावल्यानंतर मांत्रिकाकडे घेऊन जाण्याचे प्रमाण मोठे आहे. सर्पदंशाच्या उपचारासाठी मांत्रिक, भगत किंवा पारंपरिक उपचारांवर अवलंबून न राहता तातडीने शासकीय किंवा योग्य वैद्यकीय उपचार घेणे आवश्यक आहे, असेही यावेळी सांगितले. या व्याख्यानातून विद्यार्थ्यांमध्ये सापांविषयीची भीती कमी करून वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यात आला.
००००
