स्वयंघोषित ट्रस्ट स्थापन केल्याने खळबळ
  वारकरी संप्रदायात तीव्र संताप
मुरबाड प्रतिनिधी (राजीव चंदने)
तालुक्यातील  हजारो भाविक व वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या पुरातन भृगंऋषी माळ मठ, शिरोशी (माळ मठ) वर ताबा मिळविण्यासाठी काही राजकीय पुढाऱ्यांनी घाट घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. माळ मठाचे योगी कानिफनाथ गुरु जगन्नाथ महाराज यांना काही दिवसांपूर्वीच समाधी झाली. त्यांच्या पश्चात मठाची गादी सध्या मठाधिपती योगी ज्ञाननाथ गुरु कानिफनाथ महाराज सांभाळत आहेत. महाराजांना समाधी होताच याची संधी साधून काही राजकीय पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींनी घाईघाईत “गोरक्षनाथ मठ शिरोशी (माळ मठ) ट्रस्ट” नावाने स्वयंघोषित ट्रस्टची नोंदणी केली आहे.
हा मठ केवळ शिरोशी पुरता मर्यादित नसून ठाणे जिल्ह्यातील मुरबाड, शहापूर, भिवंडी, कल्याण, अंबरनाथ आणि रायगड जिल्ह्यातील कर्जत, खालापूर, पनवेल, अलिबाग येथील हजारो वारकरी, नाथ संप्रदायाचे साधक व भाविक येथे दर्शनासाठी येतात. या स्वयंघोषित ट्रस्टला मठाधिपती, मठाचे सेवेकरी, ग्रामस्थ आणि वारकरी संप्रदायाने तीव्र विरोध केला आहे. हा मठ सार्वजनिक असून तो कोणत्याही एका ट्रस्टच्या मालकीचा होऊ शकत नाही. हा प्रकार म्हणजे भाविकांच्या श्रद्धेवर घाला असल्याची भावना व्यक्त होत आहे. या प्रकरणी प्रशासनाने तातडीने लक्ष घालून पुरातन माळ मठाचे पावित्र्य, परंपरा आणि मालमत्ता यांचे संरक्षण करावे, अशी जोरदार मागणी आता सर्व स्तरातून होत आहे.
००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *