चेंदणी कोळीवाडा उत्सवासाठी सज्ज
ठाणे : रौप्य महोत्सवी वर्षात पंचवीस जोडप्यांकडून होणारी दर्याची पूजा हे चेंदणी कोळीवाड्यात यंदाच्या वर्षी चेंदणी कोळीवाडा कोळी जमात ट्रस्ट आणि चेंदणी कोळीवाडा सांस्कृतिक कला मंच तर्फे साजऱ्या करण्यात येणाऱ्या नारळी पौर्णिमेच्या पूजेचे वैशिष्ठ असणार आहे. नारळी पौर्णिमेच्या दिवशी वाजत गाजत दर्या किनारी जाऊन ज्याच्यामुळे आपली उपजीविका होते त्या दर्याची पूजा करणे हे कुठल्याही कोळीवाड्यात हमखास पहायला मिळते. ठाणे शहराला समुद्र किनारा नसला तरी खाडीकिनारा आहे. त्यामुळे खाडी किनारी जाऊन तिथे विधिवत पूजा करून नारळ अर्पण करण्याची प्रथा चेंदणी कोळीवाड्यात अनेक वर्षापासून होती पण नंतरच्या काळात सामुदायिकरित्या पूजा करणे बंद झाले होते. त्याची खंत राज्य शासनाचा गुणवंत कामगार पुरस्कार विजेते सुभाष बाळकृष्ण कोळी यांना होती. त्यामुळे त्यांनी स्वतःच पुढाकार घेत चेंदणी कोळीवाड्यातील इतरांशी संवाद साधत नारळी पौर्णिमेच्या उत्सवाची मुहूर्तमेढ रोवली. पहिल्या नारळ पौर्णिमेचा उत्सव तत्कालीन राज्यसभेचे खासदार आणि पहिले महापौर सतीश प्रधान यांच्या हस्ते नारळाची पूजा करून वाजत गाजत दर्याला अर्पण करण्यात आला. त्यानंतर सुभाष कोळींच्या पश्चात त्यांचे चिरंजीव, चेदणी कोळीवाडा कोळी जमात ट्रस्टचे विद्यमान पदाधिकारी विक्रांत कोळी यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने या उत्सवाची जबाबदारी सांभाळली आहे.
यंदाच्या वर्षी उत्सवाचे पंचविसावे वर्ष असल्याने कोळीवाड्यातील “मान आमच्या ठाण्याचा पहिला” ही एकविरा मातेच्या चैत्र नवरात्री पालखी उत्सवासाठी गाजलेल्या गीताचे दिवंगत शाहीर रमेश नाखवा यांचे चिरंजीव अभिनय नाखवा यांनी लिहिलेला आज सन नारळी पुनवेचा हे गाणे स्थानिक कलाकारांनी एकत्रित येऊन तयार केले आहे. यंदा पूर्व चेंदणी कोळीवाड्यातील विठ्ठल मंदिरात नारळाची पूजा करण्यात येणार आहे.त्यानंतर या नारळाची सवाद्य मिरवणूक काढून दत्त मंदिर, सिडको बस स्टॉप, ग. मो. कोळी मार्ग, नारायणराव कोळी चौकातून थेट चेंदणी कोळीवाडा विसर्जन जेटीवर येईल. तिथे खाडीला नारळ वाढवण्यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *