संगमेश्वर : रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद मराठी शाळा चिखली बौद्धवाडी येथील माजी विद्यार्थी निखिल अनिल मोहिते यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा उत्तीर्ण करून विक्रीकर निरीक्षक तसेच सहाय्यक निबंधक श्रेणी-१ या पदांसाठी निवड होण्याचा मान मिळवला. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती, विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती, सखी सावित्री समिती, माजी विद्यार्थी संघ, शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
सचिन कदम यांच्या अध्यक्षतेखाली हा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून रत्नागिरी जिल्हा परिषद सदस्य संतोष थेराडे, संगमेश्वर पंचायत समिती सदस्य अपर्णा जाधव, दत्ताराम लाखन, चिखली ग्रामपंचायतीच्या प्रशासक मैथिली कानाल, चिखली केंद्रप्रमुख फुंगे सर, कडवई प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष यादव, संगमेश्वर महसूल मंडळ अधिकारी उद्धव माने यांच्यासह धर्मदास मोहिते, दत्ताराम पांडव, नंदकुमार मयेकर आणि श्वेता संसारे उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी निखिल मोहिते यांच्या यशाचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी जिद्द, मेहनत आणि सातत्याच्या जोरावर स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवावे, असा संदेशही यावेळी देण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सारिका घुगे यांनी केले, तर प्रास्ताविक पूनम पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वैभव मोहिते, राजा पवार, नितेश बल्लाळ, तुषार जाधव, सागर पांडव, चंद्रकांत पाले, मनोज मोहिते, अभिराज मोहिते, अभिराज पवार आणि संस्कृती ओकटे यांनी विशेष मेहनत घेतली.
