रमेश औताडे
मुंबई: आंबेडकरी आंदोलनाचे तसेच अनुसूचित जाती, जमाती,भटके विमुक्त समाजातील कर्मचारी वर्गाचे केंद्र बिंदू असलेल्या कास्ट्राईब कार्यालयाला नागपूर महानगर पालिकेतील अधिकारी यांनी नुकतेच सील लावून आंबेडकरी आंदोलन संपवण्याचा घाट घातला आहे. या पार्श्वभूमीवर आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा संपूर्ण राज्यभरात २८ ऑगस्ट २०२६ ला राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार आहे.
या राज्यव्यापी आंदोलनातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकाऱ्यां मार्फत निवेदन सादर करण्यात येणार आहे. असे आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी सांगितले. मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन करून सरकारला या प्रश्नावर गांभीर्याने लक्ष केंद्रित करण्यासाठी साकडे घालणार आहे असे बागडे यांनी सांगितले.
००००
महिलेचा श्वसनमार्ग मोकळा झाल्याने श्वास झाला मुक्त
मुंबई : फुफ्फुसाच्या कर्करोगाशी झुंज देणाऱ्या ५७ वर्षीय महिलेचा श्वसनमार्ग ट्यूमरच्या वेगाने झालेल्या वाढीमुळे जवळपास पूर्णपणे बंद झाला होता. किम्स हॉस्पिटल्स, ठाणे येथील डॉक्टरांनी अत्यंत आव्हानात्मक आणि गुंतागुंतीची थेराप्यूटिक ब्रोन्कोस्कोपी प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडत रुग्णाचा श्वास पुन्हा सुरळीत केला. डॉ. मानस मेंगार आणि त्यांच्या टीमने ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया पार पाडली. ट्यूमर श्वासनलिकेच्या मधल्या भागात आणि दोन्ही मुख्य श्वसनमार्गांपर्यंत पसरल्यामुळे रुग्णाची प्रकृती गंभीर झाली होती.
ट्यूमरमध्ये रक्तवाहिन्यांचे प्रमाण जास्त असल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव होण्याचा तसेच फिस्टुलाचाही मोठा धोका होता. या यशस्वी प्रक्रियेनंतर रुग्णाला ऑपरेशन टेबलवरच व्हेंटिलेटरवरून बाहेर काढण्यात आले आणि प्रकृती स्थिर झाल्याने शस्त्रक्रियेनंतर चौथे दिवशी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.उपचाराच्या साडेपाच महिन्यांनंतरही रुग्णाची प्रकृती उत्तम असून ती स्वतःची दैनंदिन कामे स्वतंत्रपणे करत आहे.
