मुंबई विद्यापीठ ठाणे क्षेत्र आंतरमहाविद्यालयीन बॅडमिंटन स्पर्धा
ठाणे- ठाणे महानगरपालिकेच्या दादोजी कोंडदेव क्रीडा संकुलातील खंडू रांगणेकर बॅडमिंटन हॉल येथे राबविण्यात येणाऱ्या ‘सय्यद मोदी बॅडमिंटन प्रशिक्षण योजने’अंतर्गत प्रगत प्रशिक्षण घेणाऱ्या ठाणे बॅडमिंटन अकॅडमीच्या खेळाडूंनी आंतरमहाविद्यालयीन स्तरावरही आपल्या खेळाचा ठसा उमटवला आहे. मुंबई विद्यापीठ ठाणे क्षेत्र क्रीडा समिती व सतीश प्रधान ज्ञानसाधना कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने १७ आणि १८ ऑगस्ट रोजी दाडोजी कोंडदेव स्टेडियम येथे संपन्न झालेल्या ‘आंतरमहाविद्यालयीन बॅडमिंटन स्पर्धेत (२०२६-२७)’ ठाणे बॅडमिंटन अकॅडमीच्या खेळाडूंनी आपापल्या महाविद्यालयांचे प्रतिनिधित्व करताना उल्लेखनीय यश संपादन केले.
या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत ठाणे बॅडमिंटन अकॅडमीचे खेळाडू वेदांत जवंजाळ आणि आवेज शेख यांनी आनंद विश्व गुरुकुल महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व करत पुरुष विभागात उपविजेतेपद पटकावले. या जोडीने पहिल्या फेरीत साउथ इंडियन अंबरनाथ कॉलेजविरुद्ध ३-० अशी एकतर्फी मात करत मोहिमेची सुरुवात केली. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत सतीश प्रधान ज्ञानसाधना कॉलेजचा ३-० असा पराभव केला, तर उपांत्य फेरीत एस. आय. ई. एस. जीएसटी नेरूळ संघावर ३-१ अशी मात करून अंतिम फेरीत धडक मारली. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या अंतिम लढतीत बी. के. बिर्ला कॉलेजविरुद्ध कडवी झुंज देत वेदांत व अवेज यांनी उपविजेतेपदावर आपले नाव कोरले.
महिला विभागात ठाणे बॅडमिंटन अकॅडमीची खेळाडू वैष्णवी थोरात हिने एस. आय. ई. एस. जीएसटी कॉलेज, नेरूळचे प्रतिनिधित्व करताना संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट तंत्रशुद्ध खेळाचे प्रदर्शन करत आपल्या संघाला उपविजेतेपद (1st Runner-up) मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. ठाणे बॅडमिंटन अकॅडमीच्या या तिन्ही खेळाडूंच्या प्रभावी कामगिरीमुळे त्यांच्या महाविद्यालयांच्या यशात मोठा हातभार लागला.
खेळाडूंच्या या यशाबद्दल ठाणे महानगरपालिकेच्या (TMC) क्रीडा उपआयुक्त मीनल पालांडे मॅडम यांनी सर्व खेळाडूंचे मनःपूर्वक कौतुक केले. ठाणे महानगरपालिकेकडून खेळाडूंना मिळणाऱ्या अद्ययावत सुविधा आणि अकॅडमीचे मुख्य प्रशिक्षक श्रीकांत वाड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षक मयूर घाटणेकर, अक्षय देवलकर, मितेश हाजीरनिस, राजीव गणपुले, कबीर कंझारकर, एकेंद्र दर्जी, प्रसेनजीत शिरोडकर आणि फूलचंद पासी यांच्या अखंड मेहनतीमुळेच अकॅडमीचे खेळाडू विविध स्पर्धांमध्ये सातत्याने अव्वल कामगिरी करत असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *