रमेश औताडे
मुंबई : नागरिकांच्या धार्मिक स्वातंत्र्य, वैयक्तिक निवड, विवाह, श्रद्धा आणि गोपनीयतेच्या अधिकारांमध्ये शासनाचा अनावश्यक हस्तक्षेप नवीन सुधारित कायद्यामुळे वाढू शकतो, असा आरोप संयुक्त नागरी समाज समितीच्या प्रतिनिधींनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते फादर फ्रेझर मास्करेन्हास, संध्या गोखले, ॲड. इरफान इंजिनिअर, ॲड. लारा जेसानी,समन्वयक शाकीर भाई शेख, सलीम खान उपस्थित होते. इरफान इंजिनिअर यांनी कायद्याच्या काही तरतुदींवर आक्षेप घेतला. धर्मांतराच्या आरोपात आरोपीवरच स्वतः निर्दोष असल्याचे सिद्ध करण्याची जबाबदारी येत असल्यास, ती फौजदारी न्यायव्यवस्थेच्या मूलभूत तत्त्वांशी विसंगत ठरू शकते, असे त्यांनी सांगितले.
फादर फ्रेझर मास्करेन्हास यांनी शिक्षण आणि सामाजिक सेवेच्या संदर्भात चिंता व्यक्त केली. संध्या गोखले यांनी कायद्याकडे व्यापक घटनात्मक आणि सामाजिक दृष्टिकोनातून पाहण्याचे आवाहन केले. पत्रकार परिषदेत सहभागी नागरी समाजाच्या प्रतिनिधींनी महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा, २०२६ मागे घ्यावा किंवा त्यातील घटनात्मकदृष्ट्या आक्षेपार्ह तरतुदींचा पुनर्विचार करावा, अशी मागणी केली.
