महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्याकडून पाहणी
अशोक गायकवाड
नवी मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने स्वतःहून दाखल करून घेतलेल्या जनहित याचिका क्रमांक ३/२०२३ मध्ये २४ डिसेंबर २०२५ रोजी दिलेल्या आदेशानुसार, शहरातील वाढत्या वायू प्रदूषणावर तातडीने व प्रभावी उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील बांधकामस्थळांमुळे होणारे ध्वनी व वायू प्रदूषण तसेच सुरुंगस्फोटासाठी अवलंबावयाची मानक कार्यपद्धती जाहीर करण्यात आली असून, तिचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना सर्व बांधकामधारकांना देण्यात आल्या आहेत. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांना यापूर्वी नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्यानंतरही आवश्यक सुधारणा न करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या पाहणी दौऱ्यादरम्यान तुर्भे सेक्टर १९ मधील भूखंड क्रमांक ११ येथे मे. शेल्टॉन इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. यांच्या बांधकामस्थळी मानक कार्यपद्धतीतील अनेक नियमांचे उल्लंघन होत असल्याचे आढळून आले होते. त्यानंतर संबंधित बांधकामधारकास तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याची नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही बांधकाम स्थळी आवश्यक सुधारणा करण्यात आलेल्या नसल्याचे निदर्शनास आल्याने तुर्भे विभाग कार्यालय मार्फत संबंधित बांधकामस्थळ सीलबंद करण्यात आले. महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागाच्या माध्यमातून तुर्भे विभागाचे सहायक आयुक्त तथा विभाग अधिकारी सागर मोरे यांच्या नियंत्रणाखाली अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. यावेळी कनिष्ठ अभियंता विनोद आंब्रे यांच्यासह अतिक्रमण निर्मूलन पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच अतिक्रमण विभागातील सुरक्षारक्षक तैनात होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *