दोन दुचाकी पेटवल्या, १५ वाहनांची तोडफोड
दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात; एका अल्पवयीनाचा समावेश
कल्याण : कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खडेगोळवली परिसरात मंगळवारी रात्री अज्ञात गुन्हेगारांनी धुमाकूळ घालत दोन दुचाकींना आग लावल्याची तसेच एका रिक्षासह तब्बल १४ चारचाकी वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, त्यामध्ये एका अल्पवयीनाचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खडेगोळवली येथील पुष्पराज कॉलनीमध्ये आशीष गोकुळ तिळोंजे यांच्या दुचाकीला अज्ञात आरोपींनी आग लावली. त्याचवेळी जवळील नेहरू नगर परिसरात गौतम भिंगारदिवे यांच्या दुचाकीलाही आग लावण्यात आली. दोन्ही घटना एकाच वेळी घडल्याने पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास सुरू केला.
दरम्यान, खडेगोळवली येथील पाण्याच्या टाकीपासून कमलादेवी महाविद्यालयापर्यंत रस्त्यालगत उभी असलेली वाहनेही आरोपींनी लक्ष्य केली. यामध्ये एका रिक्षेसह १४ चारचाकी वाहनांच्या काचा फोडून त्यांचे नुकसान करण्यात आले. कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन पगार यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात साहिल फिरोज शेख आणि एका अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेमागील कारण तसेच आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा पोलीस तपास करीत आहेत.
0000
