पाण्याचा निचरा खोळंबल्याने भाजपचे टोरंट पॉवरला निवेदन
दिवा, दि. २५ ऑगस्ट: दिवा पूर्वेकडील साबे गावातील विठ्ठल मंदिराशेजारील मुख्य नाल्यामधून टोरंट पॉवर कंपनीची केबल गेल्यामुळे नाल्यातील पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडथळित होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या समस्येमुळे नाल्याला वारंवार चौकअप होऊन परिसरात सांडपाणी साचण्याची परिस्थिती निर्माण होत असल्याने भारतीय जनता पक्ष, दिवा शहरच्या वतीने टोरंट पॉवर कंपनीच्या दिवा पूर्व कार्यालयाला निवेदन देण्यात आले.
भाजप दिवा शहरचे अध्यक्ष सचिन रमेश भोईर यांनी टोरंट पॉवर कंपनीच्या अधिकाऱ्यांना हे निवेदन दिले. सावे गावातील विठ्ठल मंदिरा शेजारील मुख्य नाल्यामधून टोरंट पॉवरची केबल नेण्यात आली आहे. या केबलमुळे नाल्यातील पाण्याचा नैसर्गिक प्रवाह व्यवस्थित होत नसून पाणी अडून राहत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
नाल्यात वारंवार चोकअप होऊन परिसरातील सांडपाणी साचत असल्याने नागरिकांना दुर्गंधी, अस्वच्छता तसेच डासांचा प्रादुर्भाव यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पावसाळ्यात ही परिस्थिती आणखी गंभीर होत असून नागरिकांच्या आरोग्यासोबतच परिसराच्या स्वच्छतेलाही धोका निर्माण झाल्याचे निवेदनात म्हटले आहे.
त्यामुळे टोरंट पॉवर कंपनीने या ठिकाणी तातडीने पाहणी करून नाल्यातील पाण्याचा प्रवाह सुरळीत होण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. केबलमुळे अडथळा निर्माण होत असल्यास ती योग्य पद्धतीने स्थलांतरित किंवा व्यवस्थित करून नाल्याचा पूर्ण क्षमतेने पाणी निचरा होईल, याची व्यवस्था करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
ही समस्या नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी आणि आरोग्याशी संबंधित असल्याने प्रशासनाने तसेच संबंधित कंपनीने तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी विनंती निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच केलेल्या कार्यवाहीची माहिती लवकरात लवकर देण्यात यावी, अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली आहे.
0000
