मंगळागौरीच्या उत्साहाची नजाकत!
भाजप व विश्वास सामाजिक संस्थेतर्फे कार्यक्रम, वृषाली वाघुले यांचे आयोजन
ठाणे : जुन्या काळातील पारंपरिक पद्धतीबरोबरच बदलत्या काळानुसार नाविन्यपूर्ण पद्धतीने बदल करीत शेकडो महिलांनी मंगळागौरीचा उत्सव साजरा केला. युवती बरोबर मध्यमवयीन महिलांनी एकत्र येत अपूर्व समन्वय साधत मांडलेल्या मंगळागौरीच्या खेळांमुळे समृद्ध मराठी परंपरेच्या उत्साहातील नजाकत रसिकांना अनुभवता आली. निमित्त होते भाजप व विश्वास सामाजिक संस्थेने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय मंगळागौर स्पर्धेचे.
श्रावण महिन्याच्या निमित्ताने, दरवर्षी गडकरी रंगायतनमध्ये भाजप व विश्वास सामाजिक संस्थेतर्फे मंगळागौरी स्पर्धा भरविले जाते. मराठमोळ्या सणांबरोबरच पिढ्यान पिढ्या सुरू असलेल्या संस्कृतीची युवा पिढीला ओळख करून देण्यासाठी हा उपक्रम राबविला जातो. या स्पर्धेला राज्याच्या विविध भागातून महिलांनी उपस्थिती दर्शविली. सकाळी साडेदहापासून सुरू झालेला हा उत्सव सायंकाळी ७ पर्यंत सुरू होता. भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले, नौपाडा मंडल महिला मोर्चा अध्यक्ष वृषाली वाघुले यांनी आयोजित केलेल्या उत्सवात मंगळागौरीचे खेळ साजरे केले जात असतानाच, पारपंरिकतेबरोबरच सामाजिक संदेश आणि जनजागृतीवर भर दिला गेला.
या उत्कंठावर्धक स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्नेहासखी गटाने ३१ हजार रुपयांचे प्रथम बक्षीस मिळाले. तर नवी मुंबईतील रुचिरा गटाने २१ हजारांसह द्वितीय, डोंबिवलीतील साझ ह्यो तुझा गटाने ११ हजार रुपयांचे तृतीय, करीरोड येथील शिवाई गटाने ५ हजार रुपयांचे चतुर्थ आणि डोंबिवली येथील मराठमोळ्या गटाला २५०० रुपये मिळाले.
या कार्यक्रमाला भाजपाच्या नगरसेविका नम्रता कोळी, उषा वाघ, माधुरी मेटांगे, जिल्हा सरचिटणीस समीरा भारती, विक्रम भोईर, महिला मोर्चा अध्यक्षा स्वप्नाली साळवी, युवा मोर्चा अध्यक्ष समर्थ नायक, मंडल अध्यक्ष, महिला मोर्चा अध्यक्ष यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. या स्पर्धेच्या नियोजनासाठी ज्ञानेश्वर अंदुरे, जगदीश मोहिते, प्रशांत कळंबटे, आकाश गोसावी, बाळकृष्ण शिंपी, वसंत वाघुले, हनीफ खान, भक्ती मोहिते, राणी क्षीरसागर, पूजा सरवदे, वैशाली विधाटे, शिल्पा उतेकर, मधुरा जोगळेकर, भाग्यश्री मुळे, भंडारे काकी यांनी प्रयत्न केले.
0000
