– स्नेहा सखी गटाला राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक
अनिल ठाणेकर
ठाणे : पारंपरिक खेळांना आधुनिकतेची जोड देत शेकडो महिलांनी ठाण्यात मंगळागौरीचा उत्सव उत्साहात साजरा केला. युवतींसह मध्यमवयीन महिलांनी सादर केलेल्या मंगळागौरीच्या खेळांतून समृद्ध मराठी परंपरेचे दर्शन घडले. भाजप आणि विश्वास सामाजिक संस्थेच्या वतीने गडकरी रंगायतन येथे राज्यस्तरीय मंगळागौर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
श्रावण महिन्याच्या निमित्ताने दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या या स्पर्धेचा उद्देश युवा पिढीला मराठमोळ्या सण-परंपरांची ओळख करून देणे हा आहे. राज्याच्या विविध भागांतून महिला स्पर्धक सहभागी झाल्या. सकाळी साडेदहा वाजता सुरू झालेला हा उत्सव सायंकाळी सातपर्यंत रंगला. पारंपरिक खेळांसोबत सामाजिक संदेश आणि जनजागृतीवरही भर देण्यात आला. या स्पर्धेत सिंधुदुर्गच्या स्नेहासखी गटाने ३१ हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक पटकावले. नवी मुंबईच्या रुचिरा गटाने २१ हजार रुपयांसह द्वितीय, डोंबिवलीच्या ‘साझ ह्यो तुझा’ गटाने ११ हजार रुपयांसह तृतीय, करीरोडच्या शिवाई गटाने पाच हजार रुपयांसह चतुर्थ, तर डोंबिवलीच्या मराठमोळ्या गटाने २,५०० रुपयांचे पारितोषिक मिळवले.
भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले आणि नौपाडा मंडल महिला मोर्चाच्या अध्यक्षा वृषाली वाघुले यांच्या आयोजनातून हा उपक्रम झाला. यावेळी भाजपच्या नगरसेविका, पदाधिकारी तसेच महिला व युवा मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
