मुंबई प्रतिनिधी :मुंबईतील तीन मैदानांची १६ एकर जागा श्री विलेपार्ले केळवणी मंडळ (एसव्हीकेएम) ट्रस्टला देण्यात आल्याप्रकरणी विरोधकांनी केलेले आरोप बिनबुडाचे असून गैरसमजातून झाल्याचा दावा ट्रस्टचे अध्यक्ष अमरीश पटेल यांनी २६ ऑगस्टला ट्रस्टतर्फे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत खुलासा केला. यावेळी विरोधकांकडून वारंवार मुख्यमंत्र्यांनी ट्रस्टला भूखंड मोफत देण्यात आल्याच्या आरोपांचे अमरीश पटेल यांनी खंडन केले. तसेच एसव्हीकेएम ट्रस्टला भूखंड मोफत देण्यात आलेले नसून ते परवाना पद्धतीने मिळालेले आहेत. त्याचबरोबर या भूखंडांच्या जागेची मालकी सरकारचीच असल्याचेही यावेळी पटेल यांनी स्पष्ट केले.
यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना पटेल यांनी सामाजिक बांधिलकीतून मुंबईकरांसाठी काहीतरी देणे लागत असल्याच्या भावनेतूनच क्रीडा जगतासाठी उत्कृष्ट सुविधा देण्याची प्रामाणिक इच्छा असल्याने मुंबईत मोठे क्रीडांगण व्हावे, यासाठी भूखंडाचा वापर केला जाणार असल्याचे सांगितले. तसेच भूखंड वाटपाबाबत जाणीवपूर्वक गैरसमज पसरवण्यात आल्याचे पटेल यांनी म्हटले.
यावेळी पटेल यांनी, “मी जगातून गेल्यावरही मुंबईकर माझी आठवण काढतील, हीच माझी प्रामाणिक इच्छा असून याच उद्देशाने या भूखंडावर चांगले क्रीडांगण उभारण्याचा मानस आहे,” असे सांगितले. तसेच हे क्रीडांगण सर्व मुंबईकरांसाठी खुले राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच याप्रसंगी अमरीशभाई पटेल यांनी मुंबईत खेळाडूंना सातत्याने सराव आणि प्रशिक्षण घेता येईल, अशा दर्जेदार क्रीडा सुविधांची गरज अधोरेखित केली.
“भारत २०३६ च्या ऑलिंपिक स्पर्धांचे तसेच इतर मोठ्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यासाठी केवळ पायाभूत सुविधा नव्हे, तर क्रीडा संस्कृतीही मजबूत करणे गरजेचे आहे. मुंबईतील तरुण खेळाडूंना चांगल्या सुविधा, सातत्यपूर्ण प्रशिक्षण आणि योग्य मार्गदर्शन मिळाले, तर त्यातून भविष्यातील विजेते घडू शकतात. याच उद्देशाने मुंबई उपनगरातील एक लाख तरुणांपर्यंत जागतिक दर्जाची क्रीडा परिसंस्था पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे,” असे पटेल यांनी म्हटले.
दरम्यान, एसव्हीकेएम संस्थेने आतापर्यंत एकात्मिक क्रीडा परिसंस्था विकसित करण्यासाठी १०० कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली आहे. मुंबईतील तरुणांना क्रीडा क्षेत्रात अधिक संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या सुविधांचा विकास करण्यात येणार असल्याचे संस्थेने म्हटले आहे. या प्रकल्पासाठी मुंबई महापालिकेने सप्टेंबर २०२५ मध्ये निविदा प्रक्रिया राबवली होती. सात संस्थांनी या प्रक्रियेत सहभाग घेतला, तर चार संस्थांचा अंतिम मूल्यांकनासाठी विचार करण्यात आला. एसव्हीकेएमने एकूण महसुलातील ५० टक्के हिस्सा देण्याची सर्वाधिक बोली सादर केली असल्याचे संस्थेने म्हटले आहे.
मुंबईत क्रीडा सुविधांना नवी दिशा देण्याचा संस्थेचा उद्देश असून, मुंबईतील क्रीडा पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी श्री विलेपार्ले केळवणी मंडळ (एसव्हीकेएम) शहरातील तीन ठिकाणी क्रीडा सुविधांचा विकास आणि व्यवस्थापन करणार आहे. अंधेरीतील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल, विलेपार्लेतील लोकमान्य टिळक गार्डन आणि अंधेरीतील डी. एन. नगर येथील सिमेंट गोडाऊन या तीन ठिकाणांचा त्यात समावेश असून, या जागांचे एकूण क्षेत्रफळ १६ एकर नसून १४.११ एकर आहे.
या तिन्ही जागांची मालकी मुंबई महापालिका आणि महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाकडे (म्हाडा) कायम राहणार आहे. एसव्हीकेएमला म्हाडाच्या जागा ३ वर्षांसाठी, तर मुंबई महापालिकेचे क्रीडा संकुल १० वर्षांसाठी सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) पद्धतीने मर्यादित कालावधीसाठी देण्यात आले आहे.
त्यामुळे जागांचे कायमस्वरूपी हस्तांतरण संस्थेकडे झालेले नसून, मालकी मुंबई महापालिका आणि म्हाडाकडेच राहणार असल्याचे एसव्हीकेएमने स्पष्ट केले आहे. या प्रकल्पांतर्गत स्थानिक नागरिक, मुले आणि युवा खेळाडूंना अधिक चांगल्या क्रीडा सुविधा आणि व्यावसायिक प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे. भारतीय खेळ खो-खो, कबड्डी, क्रिकेट, फुटबॉल, अॅथलेटिक्स, टेनिस, बास्केटबॉल, पिकलबॉल, तसेच इनडोअर जिम्नॅशियम आणि इनडोअर खेळांच्या सुविधांचा विकास करण्यात येणार आहे.
या प्रकल्पासाठी लागणारा भांडवली खर्च, संचालन आणि सुविधांच्या विकासासाठीचा सर्व देखभाल खर्च एसव्हीकेएम करणार आहे. अंधेरीतील क्रीडा संकुलासाठी अतिरिक्त ४० ते ५० प्रमाणित प्रशिक्षक, क्रीडा अधिकारी, समन्वयक आणि शारीरिक शिक्षण शिक्षक नियुक्त करण्याचे प्रस्तावित आहे. एसव्हीकेएमच्या म्हणण्यानुसार, संस्थेच्या क्रीडा उपक्रमांमध्ये सध्या १४८ हून अधिक क्रीडा प्रशिक्षक कार्यरत आहेत.
दरम्यान, या तीन जागांचे एकत्रित क्षेत्रफळ १६ एकर नसून १४.११ एकर असल्याचेही एसव्हीकेएमने स्पष्ट केले आहे. अंधेरीतील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलाचे क्षेत्रफळ ११.५७ एकर, विलेपार्लेतील लोकमान्य टिळक गार्डनचे ०.९२ एकर आणि डी. एन. नगरमधील जागेचे १.६२ एकर आहे.
एसव्हीकेएमची खेळाबद्दल दूरदृष्टी आणि कटिबद्धता
• २०३६ मध्ये भारत ऑलिंपिक स्पर्धांचे आयोजन करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.
• ऑलिंपिक स्पर्धा भारतात होणार असतील, तर त्यासाठी सक्षम क्रीडा पायाभूत सुविधा निर्माण करणे गरजेचे आहे.
• त्यामुळे सर्वोत्तम आणि जागतिक दर्जाच्या क्रीडा सुविधा तयार होणे आवश्यक आहे.
• मुंबईतील खेळाडूंना सर्वोत्तम क्रीडा सुविधा आणि प्रशिक्षण मिळावे, यासाठी एसव्हीकेएम ही तयारी करत आहे.
0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *