घोटगे -सोनवडे घाट मार्गाला केंद्राची अंतिम मंजुरी!
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी)–सिंधुदुर्ग- कोल्हापूर जोडणाऱ्या गेली कित्येक वर्षे रखडलेल्या घोटगे -सोनवडे घाट मार्गाला अखेर केंद्रीय पर्यावरण समितीने अंतिम परवानगी दिली आहे. त्यामुळे आता या नव्या घाटाच्या प्रत्यक्ष उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी ही माहिती दिली.
यापूर्वी सदर घाट मार्गाला पर्यावरणीय मंजुरी मिळाली होती आता केंद्र सरकारकडून अंतिम परवानगी मिळाल्याने प्रकल्पाला आता हिरवा कंदील मिळाला आहे खासदार नारायण राणे पालकमंत्री नितेश राणे तसेच राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करून ही मंजुरी मिळवण्यासाठी बरेच प्रयत्न केले त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो असे राणे यावेळी म्हणाले
या मार्गामुळे परिसराच्या विकासालाही मोठी चालना मिळेल हा घाट मार्ग पूर्ण करण्यासाठी स्थानिक तसेच राज्य पातळीवर आवश्यक ती पावले लवकरात लवकर उचलण्यात येतील आणि प्रकल्प मार्गी लावला जाईल असेही राणे यांनी सांगितले. सिंधुदुर्ग कोल्हापूर जोडणाऱ्या या घाट मार्गाचा प्रश्न १९८५ पासून प्रलंबित आहे. हा घाट मार्ग व्हावा ही तत्कालीन जि. प. सदस्य कै.महेंद्र नाटेकर यांची मूळ कल्पना. या मागणीसाठी त्यांच्या नेतृत्वाखाली घोटगे- सोनवडे व आसपासच्या गावातील ग्रामस्थांनी अनेक आंदोलने उपोषणे, धरणा कार्यक्रम केले. मोर्चेही काढले. मात्र दिल्लीच्या पर्यावरण विभागात हा प्रकल्प मंजुरीसाठी अडकून पडला.
माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांनी गेली दोन वर्षे केंद्राकडे या संबंधात पाठपुरावा केला अखेर त्याला यश येऊन आता अंतिम मंजुरी मिळाली आहे. या घाट मार्गामुळे कुडाळ घोटगे -सोनवडे ते कोल्हापूर हे अंतर तब्बल ४० किलोमीटरने कमी होणार आहे. दीड ते दोन तासात कुडाळ वरून कोल्हापूर गाठता येणार आहे. सह्याद्रीच्या रांगांमधील अनेक गावे मुख्य विकास प्रवास सामील होणार आहेत. या घाट मार्गामुळे संपूर्ण कुडाळ मालवण या दोन तालुक्यांसह वेंगुर्ले आणि कणकवली तालुक्यातील अनेक गावे कोल्हापूरच्या अधिक जवळ येणार आहेत.
भुदरगड (कोल्हापूर )ते कुडाळ (सिंधुदुर्ग) ही ब्रिटिश काळातील पाऊलवाट होती. २०२५ मध्ये कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या आदेशाने, प्रयत्नाने तांत्रिक सर्वेक्षण करून मार्ग निश्चित करण्यात आला. जुलै,२०२५ मध्ये स्थानिक आमदार डॉ. निलेश राणे यांनी दिल्लीत पर्यावरण विभागात अडकलेल्या या प्रकल्पाच्या अंतिम परवानगीसाठी हालचाली सुरू केल्या. खासदार विद्यमान खासदार नारायण राणे यांनीही या प्रश्नाचा दिल्लीत जोरदार पाठपुरावा केला जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनीही राज्य सरकारच्या पातळीवर त्याचा पाठपुरावा केला अखेर या तिघांनी दिल्ली गाठत पर्यावरण मंत्रालयाची अंतिम परवानगी मिळवली. १३ किलोमीटर लांबीच्या सोनवडे (कुडाळ)-शिवडाव (कोल्हापूर) या नव्या घाट मार्गाला केंद्रीय पर्यावरण समितीची अंतिम मंजुरी मिळाली असून त्यासाठी १३ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हा मार्ग बनवला जाणारा असून संपूर्ण वर्षभर या घाटातून प्रवास करता येणार आहे.
