महावितरणचे गणेश मंडळांना आवाहन
मुंबई: यंदाचा गणेशोत्सव निर्विघ्न आणि सुरक्षित वातावरणात साजरा करण्यासाठी सर्व गणेशोत्सव मंडळांनी वीज सुरक्षेची योग्य ती खबरदारी घ्यावी, तसेच उत्सव कालावधीत केवळ अधिकृत वीज जोडणीच (वीज कनेक्शन) घ्यावी, असे आवाहन ‘महावितरण’कडून करण्यात आले आहे. उत्सवाच्या काळात कोणतीही अप्रिय घटना वा दुर्घटना घडू नये याची खबरदारी घ्यावी. आगमन आणि विसर्जन मिरवणुकीदरम्यान रस्ते तसेच गल्लीबोळांतील विजेच्या तारांची (वीजवाहिन्या) उंची लक्षात घेऊनच गणेशमूर्तीची उंची व रथाची रचना निश्चित करावी. त्याचप्रमाणे मंडप आणि रोषणाईसाठी वीज संचाची मांडणी करताना सुरक्षेच्या नियमांचे पालन केले जावे. अपघात टाळण्यासाठी केवळ प्रमाणित आणि कुशल विजेच्या ठेकेदारांकडूनच हे काम करून घ्यावे. गणेश मंडळांसाठी वीज जोडणी घेण्याची प्रक्रिया महावितरणने अत्यंत सोपी केली आहे. मंडळांना महावितरणच्या अधिकृत मोबाईल अ‍ॅप किंवा ऑनलाईन संकेतस्थळावरून अर्ज करून त्वरित तात्पुरती वीज जोडणी मिळवता येणार आहे. सार्वजनिक सुरक्षेचा विचार करता कोणत्याही मंडळाने अनधिकृतपणे विजेचा वापर करू नये, तसेच विजेच्या तारा किंवा खांबाजवळ मंडप उभारताना पुरेशी काळजी घ्यावी, असेही महावितरणने स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *