मुंबई : लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात रक्षाबंधनापूर्वीच १५०० रुपये जमा होण्यास सुरु झाले आहेत पण यासाठी सामाजिक न्याय विभागातून ३४४ कोटी रुपयांचा निधी महिला व बालविकास विभागाकडे वितरित करण्यात आला आहे. हा प्रकार म्हणजे एकाच्या तोंडातून काढून दुसऱ्याला देण्याचा अघोरी प्रकार आहे. लाडक्या बहिणांनी पैसे देताना मागासर्गीय समाजातील बहिण भावांवर भाजपा महायुती सरकार अन्याय करत आहे आणि हा अन्याय आम्ही सहन करणार नाही, असे मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी म्हटले आहे.
काँग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस पुढे म्हणाले की, भाजपा महायुती सरकारकडे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी योग्य त्या प्रमाणात निधीची तरतूद नाही. ही योजना सुरु ठेवण्यासाठी इतर समाजाच्या कल्याणकारी योजनांचा निधी वापरला जात असून हा त्या विभागावर व समाज घटकांवर अन्याय आहे. सामाजिक न्याय विभागाचा निधी लाडकी बहिण योजनेसाठी वळवण्याचा हा पहिला प्रकार नसून याआधी सुद्धा सरकारने असाच प्रकार केला आहे. सामाजिक न्याय विभागाचा निधी नियमानुसार त्याच समाज घटकांच्या कल्याणकारी योजनांसाठी वापरला पाहिजे असे असतानाही सरकार वारंवार नियमाला बगल देत सामाजिक न्याय विभागाचा निधी वापरत आहे, हे आक्षेपार्ह आहे. भाजपा महायुती सरकारमध्ये मागासवर्गीय समाजाचे कोणी वालीच नाही. या विभागाचे मंत्री काय झोपा काढत आहेत का, आणि त्यांचे काही चालत नसेल तर खूर्चीवर बसून शोभा वाढवू नका.
भाजपा महायुती सरकारच्या काळात दलित, आदिवासी, मागासवर्गीय समाजावर अन्याय व अत्याचार वाढले आहेत. मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी सरकारकडे पैसे नाहीत, आदिवासी विद्यार्थी त्यांना सुविधा मिळत नाहीत म्हणून उपोषण करत आहेत पण सरकार मात्र निर्लज्जपणे या समाज घटकावर अन्याय करत आहे. आम्ही सातत्याने यावर आवाज उठवला पण भाजपा सरकारच्या वर्तणुकीत काहीही फरक पडलेला नाही. भाजपा हा आदिवासी, दलित, मागासवर्गीय विरोधी असल्याचे पुन्हा पुन्हा स्पष्ट होत आहे, असेही सुरेशचंद्र राजहंस म्हणाले.
