‘स्मॅश द पेट्रिआर्की’ने मुलींची मने जिंकली
हरिभाऊ लाखे
नाशिक – काँग्रेसच्या राज्यातील नवनियुक्त जिल्हाध्यक्षांशी संवाद साधण्यापूर्वी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संबंधितांच्या कुटुंबीयांची वैयक्तिक भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. कोणाचे आई, कोणाचे वडील, कोणाचे पती, तर कोणाचा मुलगा इतक्या वर्षांपासून काँग्रेससाठी काम करीत आहे. त्यांच्या कुटुंबीयांप्रती आदर आणि आभाराची भावना म्हणून ही भेट होती. राहुल यांनी आपुलकीने संवाद साधल्याने कुटुंबीय सुखावून गेले. यातील ‘जेन झी’चीही मते त्यांनी जाणून घेतली. पुण्यातील ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमानंतर मुलींमध्ये ते सर्वात चर्चेचा विषय ठरले. ‘स्मॅश द पेट्रिआर्की’ या धोरणाने त्यांनी मुलींची मने जिंकली, अशा शब्दांत राहुल गांधी यांची भेट घेऊन बाहेर पडलेल्या कुटुंबातील सदस्यांनी भावना व्यक्त केली.
संघटन सृजन अभियानांतर्गत निवड झालेल्या राज्यातील काँग्रेसच्या ७८ नवनियुक्त जिल्हाध्यक्षांच्या १० दिवसीय प्रशिक्षण शिबिराचा समारोप बुधवारी पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या दिवशी जिल्हाध्यक्षांच्या कुटुंबीयांना खास निमंत्रित करण्यात आले होते. ही भेट त्यांच्यासाठी आनंददायी व अविस्मरणीय ठरली.
छत्रपती संभाजीनगर येथील इयत्ता बारावीत शिक्षण घेणाऱ्या सयाजी पाटील याचा आज वाढदिवस होता. खोलीत प्रवेश केल्यानंतर राहुल यांनी सयाजीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्याच्या शिक्षणाबद्दल आणि पुढे काय करायचे याबद्दल माहिती घेतली. त्यांनी ‘जेन झी’विषयी विचारणा केल्यानंतर ‘आपण अलीकडेच जे घडले, ते योग्य होते,’ असे उत्तर दिल्याचे सयाजी याने नमूद केले.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांना भेटून खूप आनंद झाल्याचे अनेक कुटुंबीयांनी सांगितले. यवतमाळचे जिल्हाध्यक्ष ॲड. सचिन नाईक यांच्या कुटुंबातील सदस्यांनी राहुल गांधी यांच्याशी चर्चा केली. ‘पती २६ वर्षांपासून काँग्रेसचे काम करतात. पक्षाच्या प्रमुखांना आज पहिल्यांदा प्रत्यक्ष भेटण्याची संधी मिळाली. त्यांनी अतिशय आपुलकीने आमच्याशी संवाद साधल्याने छान वाटले,’ अशी भावना सारिका नाईक यांनी व्यक्त केली.
तर नाईक यांची मुलगी डॉ. शर्मिष्ठा नाईक यांनी राहुल गांधी यांनी काँग्रेसचे प्रदीर्घ काळापासून काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांची आवर्जून घेतलेली भेट ही आभाराची भावना असल्याचे नमूद केले. आजच्या काळातील ते एकमेव खरे आणि विश्वासार्ह राजकारणी आहेत. ‘जेन झी’मध्येही ते आवडते नेते असून सध्या ते एकदम ट्रेंडमध्ये आहेत. काही दिवसांपूर्वी पुणे येथे त्यांनी जो कार्यक्रम घेतला, तो मुलींमध्ये खूप चर्चेचा विषय आहे. ‘स्मॅश द पेट्रिआर्की’ या राहुल गांधी यांच्या धोरणाने मुलींची मने जिंकली,’ असे डॉ. शर्मिष्ठा नाईक यांनी सांगितले.
