वेदविद्या, पौरोहित्य आणि संस्कृत परंपरेच्या जतनासाठी आयुष्यभर कार्य
योगेश चांदेकर
पालघर : वेदविद्या, पौरोहित्य आणि संस्कृत परंपरेच्या जतनासाठी आयुष्यभर कार्य करणारे पालघर जिल्ह्यातील नामवंत वेदमूर्ती गजानन यशवंत नामजोशी यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. पाचशेहून अधिक विद्यार्थ्यांना वेदांचे शिक्षण देणारे आणि वेदपाठशाळेच्या माध्यमातून वेदपरंपरा पुढे नेणारे गुरुजी म्हणून ते परिचित होते. त्यांच्या पश्चात पत्नी सुनीता, मुले आनंद व सुजन, सुना मधुरा व सुजाता, दोन नाती आणि एक नातू असा परिवार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील जांभूळआडी येथे जन्मलेल्या नामजोशी यांचे बालपण धार्मिक वातावरणात गेले. वयाच्या चौदाव्या वर्षी ते पालघर येथे आले. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांनी नोकरी स्वीकारली; मात्र नोकरी सांभाळतानाही वेद आणि पौरोहित्याचा अभ्यास सुरू ठेवला. पुढे नोकरीचा राजीनामा देऊन त्यांनी पौरोहित्याचे काम सुरू केले आणि वेदविद्या पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा ध्यास घेतला.
याच ध्यासातून १९९१ मध्ये त्यांनी आपल्या राहत्या घरी ‘ऋग्वेद वेदपाठशाळा, पालघर’ सुरू केली. या पाठशाळेत ऋग्वेदाच्या आश्वलायन शाकल शाखेचे शिक्षण दिले जात होते. पालघर, सफाळे, केळवा, बोईसर, डहाणू, वसई, विरार, पनवेल यांसह परिसरातील विविध भागांतून विद्यार्थी वेदाध्ययनासाठी येत असत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अंदाजे पाचशे विद्यार्थ्यांनी वेदांचे शिक्षण घेतले.
वेदाध्यापनाबरोबरच विद्यार्थ्यांना धार्मिक विधींचे प्रत्यक्ष ज्ञान मिळावे यासाठी त्यांनी १९९५ ते २०२३ या कालावधीत विविध यज्ञ-याग आणि भागवत सप्ताहांचे आयोजन केले. तसेच समिधा व्यवसायाच्या माध्यमातून परिसरातील कष्टकरी समाजाला रोजगाराचे साधन उपलब्ध करून दिले. त्यांच्या कार्याची दखल घेत विविध ठिकाणी त्यांचा सन्मान करण्यात आला होता.
गजानन नामजोशी यांनी विद्यार्थ्यांना केवळ वेदपाठच नव्हे, तर पौरोहित्याची शिस्त, धार्मिक विधी आणि संस्कारांची शिकवण दिली. त्यांच्या निधनाने पालघर परिसरातील वेदविद्येच्या क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून, त्यांनी घडवलेले शेकडो विद्यार्थी आणि उभी केलेली वेदपाठशाळा हीच त्यांच्या कार्याची चिरंतन ओळख ठरणार आहे.
0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *