सिंधुदुर्गातील मतदान केंद्रांना दिल्या भेटी…!
सिंधुदुर्ग(प्रतिनिधी)– कोकण विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक रुबल अगरवाल या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर असून विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम, 2026 अंतर्गत त्यांनी जिल्ह्यातील काही ठिकाणाना भेटी देऊन कामकाजाची पाहणी केली
यामध्ये मतदान केंद्रांवर भेटी, मतदार नोंदणी कार्यालय आढावा, प्रक्रियेतील अधिकारी व कर्मचारी यांचा आढावा तसेच राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.
सिंधुदुर्गात आगमन होताच आज सकाळी त्यांनी कणकवली विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा क्र.१ येथील (२६१ व २६२) मतदान केंद्राला भेट देऊन पाहणी केली. त्यांनी या ११३९ मतदार असलेल्या मतदान केंद्रावरील उपलब्ध सुविधा, मतदार नोंदणी व विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत सुरू असलेल्या कामकाजाची माहिती घेतली. तसेच संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधून मतदार यादी पुनरिक्षणाची प्रक्रिया अचूक व प्रभावीपणे राबविण्याबाबत आवश्यक सूचना केल्या. उपस्थित विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधत शालेय शिक्षण व पोषण आहाराबाबत चर्चा झाली.
त्यानंतर कलमठ ग्रामपंचायतीला भेट देऊन तेथील विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत सुरू असलेल्या कामकाजाची पाहणी केली. यावेळी त्यांनी सुरू असलेल्या योजनांची माहिती घेत उपस्थित पदाधिकारी आणि ग्रामस्थांशी संवाद साधला.
याप्रसंगी अपर आयुक्त फरोग मुकादम, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, पंचायत समिती सभापती हर्षदा वाळके, उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे, कणकवली उप विभागीय अधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, वैभववाडी तहसीलदार सूर्यकांत पाटील, देवगड तहसीलदार शीतल जाधव यांच्यासह महसूल व निवडणूक विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
आयुक्त अगरवाल यांनी नंतर कुडाळ तालुक्यातील पावशी (ढवनवाडी) येथील मतदान केंद्राला भेट देऊन विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम २०२६ अंतर्गत सुरू असलेल्या कामकाजाची क्षेत्रीय पाहणी केली.
यावेळी त्यांनी मतदान केंद्रावरील मतदार यादी, उपलब्ध सुविधा तसेच विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत करण्यात येत असलेल्या विविध कार्यवाहीची माहिती घेतली. संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधून मतदार यादी अधिक अचूक व निर्दोष करण्याच्या दृष्टीने सुरू असलेल्या कामकाजाचा आढावा घेतला.
याप्रसंगी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, अपर आयुक्त फरोग मुकादम, उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे, कुडाळ उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळूसे, कुडाळ तहसीलदार सचिन पाटील तसेच सरपंच वैशाली पावसकर, ग्रामपंचायत सदस्य वृणाल कुंभार, नयना तवटे, ग्रामपंचायत अधिकारी डी.एस. चव्हाण, बीएलओ गंगाराम पारकर, पोलिस पाटील शेखर शेलटे, तलाठी लता पाटील उपस्थित होते.
