आदित्य ठाकरेंची भेट

नाशिक – शहरातील ईदगाह मैदानावर काही दिवसांपासून आदिवासी विद्यार्थी प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाला बसले आहेत. आंदोलकांचे सध्या दोन वेळच्या जेवणाचे हाल होत आहेत. आंदोलनस्थळी १०० हून अधिक विद्यार्थी असून तीन विद्यार्थी उपोषणास बसले आहेत. गुरूवारी उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आंदोलकांची भेट घेत आंदोलनाला पाठिंबा दिला. आंदोलकांची जेवणाची व्यवस्था शिवभोजन थाळीतून करण्यात यावी, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली.
राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले शंभरपेक्षा अधिक विद्यार्थी आंदोलनात सहभागी आहेत. त्यातील नाशिक, सुरगाणा तसेच नंदुरबार येथील विवेक गावित, राहुल पावरा आणि लक्ष्मी जाधव यांनी मागण्या मान्य होईपर्यंत अन्नत्याग करत उपोषणास सुरूवात केली आहे. राज्यातील आश्रमशाळांमध्ये ५९२ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून विद्यार्थ्यांच्या कुटूंबियांना नुकसान भरपाई आणि अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात यावे, आश्रमशाळांमधील संशयास्पद मृत्यू आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेतील त्रुटीं पाहता आदिवासी विकास मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी केंद्रीय भोजन व्यवस्था बंद करून ताजे अन्न द्यावे, विद्यार्थ्यांकडून देणगीच्या नावाखाली पैसे घेतले जात असल्याने विद्यार्थ्यांची होणारी लूट थांबवावी, आदिवासी क्रीडा प्रबोधिनीतील भ्रष्टाचार काढून टाकण्यासाठी आदिवासी सामाजिक संस्थांना बरोबर घेत समिती स्थापन करावी, आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा १० लाख रुपयांचा विमा काढण्यात यावा, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
आमदार आदित्य ठाकरे यांनी उपोषण करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तब्येची विचारपूस करुन आंदोलनाला पाठिंबा दिला. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला ताकद देण्यासाठी आलो असल्याचे त्यांनी सांगितले. कॉग्रेसचे नेते राहुल गांधी, राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांच्याशी चर्चा करणार आहे. आंदोलकांच्या मागण्या रास्त असताना सरकार उडवाउडवीची उत्तरे देत आहे. मुख्य मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत. सरकारकडून टोलवाटोलवी केली जात आहे. पुण्यात देखील असे आंदोलन सुरू होते. सरकारने ते उठवले. उपोषण करून कोणी मरत असेल तरी या सरकारला कोणताही फरक पडत नाही, असे ठाकरे यांनी सांगितले.
ईदगाह मैदानावर सुरु असलेल्या आंदोलनाच्या ठिकाणी कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, नेते विजय वडेट्टीवार, खा. राजाभाऊ वाजे, खा. भास्कर भगरे, खा. शोभा बच्छाव, आ. हिरामण खोसकर आदींनी भेट दिली आहे. लोकप्रतिनिधींकडून राजकीय पर्यटन सुरू असतांना आंदोलकांच्या परिस्थितीत सुधारणा नाही. दोन दिवसांपासून आंदोलकांना जेवायला मिळत नाही. आंदोलनस्थळी पिण्याचे पाणी नाही. मुले पदरमोड करत पाण्याच्या बाटल्या आणत आहेत. काही नातेवाईकांकडून पाणी आणत आहेत. तीन दिवसांपूर्वी शिवसेनेच्या एका नेत्याने आंदोलकांसाठी स्वखर्चाने सहा स्वच्छतागृह दिले. गुरूवारी आ. आदित्य ठाकरे यांनी आंदोलकांची भेट घेतली असता शिवभोजन थाळीतून आंदोलकांसाठी रोज १०० ते १५० ताटांची व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *