विधानसभा उपाध्यक्ष आण्णा बनसोडे यांचे शिष्टमंडळाला आश्वासन
अशोक गायकवाडv
मुंबई : ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील मौजे जांभूळ येथे इंग्रज राजवटीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मालकीची असलेल्या जमिनीवर त्यांच्या स्मृतींना साजेसे उचित स्मारक उभारण्याचा प्रश्न आता मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकरणी शासनाकडे प्रलंबित असलेला प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेण्याचे आश्वासन विधानसभेचे उपाध्यक्ष आण्णा बनसोडे यांनी दिले. मुंबईतील विधानभवन येथे डॉ. बी. आर. आंबेडकर प्रतिष्ठानच्या शिष्टमंडळाने विधानसभा उपाध्यक्ष बनसोडे यांची भेट घेऊन जांभूळ येथील स्मारकाच्या प्रलंबित प्रश्नाकडे त्यांचे लक्ष वेधले. या वेळी स्मारक उभारणीसाठी आवश्यक असलेल्या प्रशासकीय कार्यवाहीला गती देण्याची मागणी करण्यात आली. यावर बोलताना बनसोडे यांनी, महसूलमंत्री, सामाजिक न्यायमंत्री, महिला व बालविकास मंत्री, ठाणे जिल्हाधिकारी, कल्याण तहसीलदार तसेच संबंधित सर्व शासकीय अधिकारी आणि डॉ. बी. आर. आंबेडकर प्रतिष्ठानचे पदाधिकारी यांची संयुक्त बैठक विधानभवनात आयोजित करण्यात येईल, असे सांगितले. या बैठकीत प्रलंबित बाबींचा आढावा घेऊन स्मारकाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आवश्यक निर्णय घेतले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक वास्तव्याशी व मालकीशी संबंधित जांभूळ येथील जमिनीला ऐतिहासिक महत्त्व आहे. त्यामुळे या ठिकाणी त्यांच्या कार्याला आणि स्मृतींना साजेसे स्मारक उभारण्याची मागणी दीर्घकाळापासून करण्यात येत आहे. या शिष्टमंडळात डॉ. आंबेडकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल हंडोरे, महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा कुसुम गौतम गेडाम, नाट्य व मालिका अभिनेत्री करुणा कातखडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
०००००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *