दोन स्वतंत्र कारवायांत ४ आरोपी अटकेत; २ किलो ८२३ ग्रॅम एमडीसह ५ कोटी ६६ लाखांचा मुद्देमाल जप्त
अनिल ठाणेकर
ठाणे : ठाणे शहरात अमली पदार्थांची विक्री, वाहतूक व साठवणूक करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली असून, अमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखेने केलेल्या दोन स्वतंत्र कारवायांमध्ये तब्बल ४ आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत २ किलो ८२३ ग्रॅम वजनाचा एमडी (मेफेड्रोन) अमली पदार्थ जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ५ कोटी ६६ लाख ३७ हजार २९० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. पहिली कारवाई १ सप्टेंबरला रात्री १.५० वाजता घोडबंदर रोडवरील गायमुख बसस्टॉपजवळ करण्यात आली. या कारवाईत मोजीम अब्दुल्ला शेख (वय ४१, रा. मिरारोड) आणि तबरेज अब्दुल्ला शेख (वय ५१) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
आरोपींकडून अनुक्रमे ५६७ ग्रॅम व ५६ ग्रॅम एमडी, तसेच त्यांच्या ताब्यातील ॲक्सेस स्कूटरच्या डिक्कीतून आणखी १ किलो ४८ ग्रॅम एमडी, असा एकूण १ किलो ६७१ ग्रॅम एमडी जप्त करण्यात आला. या एमडीची किंमत ३ कोटी ३४ लाख २० हजार रुपये असल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद आहे. या प्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५४६/२०२६ नोंद करण्यात आला असून, एनडीपीएस कायद्यानुसार कलम ८(क), २२(क), २९ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रविण फडतरे करीत आहेत. अटक आरोपींना ३ सप्टेंबर रोजी पोलिस कोठडी मंजूर झाली आहे.
दुसरी कारवाई कोपरी येथील बीएसएनएल कार्यालयाजवळ करण्यात आली. या कारवाईत अब्दुल रेहमान मोईद्दीन कादर शेख (वय ३३, रा. गोवंडी, मुंबई) याच्याकडून १ किलो १५२ ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले. या अमली पदार्थाची किंमत २ कोटी ३० लाख ४० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणाच्या तपासात एमडीचा पुरवठा करणाऱ्या आफ्रिदी मोहम्मद वली शेख (वय २७, रा. रूम सीवुड, नवी मुंबई) यालाही अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३४८/२०२६ नोंद असून, एनडीपीएस कायद्यानुसार कलम ८(क), २२(क), २९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक सपना ताटे करीत आहेत. अटक आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
दोन्ही प्रकरणांमध्ये जप्त करण्यात आलेला एमडी आरोपींनी कोणाकडून आणला आणि कोणाला विक्री करणार होते, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. या तपासातून अमली पदार्थांच्या पुरवठ्याची साखळी आणि त्यामागील अन्य व्यक्तींची माहिती समोर येण्याची शक्यता आहे. ही कारवाई पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखेने केली. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अमली पदार्थांची विक्री, साठवणूक, वाहतूक किंवा सेवन करणाऱ्या व्यक्तींबाबत माहिती असल्यास ती पोलिसांना द्यावी. माहिती देणाऱ्यांची नावे गोपनीय ठेवण्यात येतील, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *