छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय प्रकरणी
अनिल ठाणेकर
ठाणे – छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय सध्या अनागोंदी माजली आहे. जेवणात झुरळ मिळत आहेत. शौचालयात घाणीचे साम्राज्य आहे. प्रशिक्षणार्थी डॉक्टर्सना २४ तास काम करूनही सुविधा दिल्या जात नाहीत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस नताशा आव्हाड यांनी पालिका अधिकारी भगवान शिंदे आणि रूग्णालय अधिष्ठात्री स्वप्नाली कदम यांना चांगलेच फैलावर घेतले. जर, येत्या आठ दिवसात परिस्थितीत सुधारणा केली नाही तर रूग्णालयातच आंदोलन केले जाईल,  असा इशारा नताशा आव्हाड आणि गटनेते अभिजीत पवार यांनी दिला.
छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयातील अनागोंदीबाबत नताशा आव्हाड आणि अभिजीत पवार यांनी गटनेते कार्यालयात संबधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी अधिकाऱ्यांकडून असंबद्ध माहिती दिल्याने नताशा आव्हाड आणि अभिजीत पवार हे चांगलेच संतप्त झाले.
या बैठकीनंतर बोलताना नताशा आव्हाड म्हणाल्या की, काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयात एका रुग्णांच्या जेवणात झुरळ सापडले होते. या संदर्भात आम्ही रूग्णालयाचा पाहणी दौरा केला होता. त्यावेळी तेथे एवढी अस्वच्छता होती की आम्हाला तिथे उभे राहणे शक्य होत नव्हते,  कॅन्टीनच्या बाजूला एक शौचालय आहे,  त्या शौचालयामध्येच  कॅन्टीनमधील भांडी धुतली जात होती. याच ठिकाणी बांधकामाचा राडारोडा पडलेला होता. याबाबत, ठामपाच्या बांधकाम विभागाचे अधिकारी  भगवान शिंदें यांना विचारणा केली असता, “आम्ही एकदम पटापट हे काम करू”, असे उत्तर दिले. त्यांचे हे उत्तर गोलमाल आहे.  आम्ही सहा महिन्यांपूर्वी विजिट केली होती, तेव्हाही कन्स्ट्रक्शनचे काम चालू होते, आजही कन्स्ट्रक्शनचे काम चालू आहे.
रुग्णालयाच्या बाहेर बायोमेडिकल वेस्ट, चक्क सॅनिटरी पॅडसारख्या वस्तू उघड्यावर टाकल्या जात आहेत. सर्वात मोठा विषय म्हणजे, प्रशिक्षणार्थी डाॅक्टर्स चोवीस- चोवीस तास,  काम करतात. त्या नंतर ते हॉस्टेलच्या रूममध्ये जेव्हा जातात,  तेव्हा तिथेही त्यांना घाणीत आराम करावा लागत आहे. प्रसाधनगृहातील नळ॔  तुटलेली आहेत. याबाबत तक्रार केल्यानंतर त्यांचे पाणी बंद केले होते. हा प्रकार मानवतेला अनुसरून नाही. आम्ही हा प्रकार सहन करणार नाही, असेही नताशा आव्हाड म्हणाल्या.
गटनेते अभिजीत पवार यांनी, सदर बैठकीत भगवान शिंदे हे उडवाउडवीची उत्तरे देत होते. पार्किंगच्या वादातून ते प्रशिक्षणार्थी डाॅक्टर्सवर झालेल्या वादाचा ते राग काढत आहेत. दिवसरात्र काम करणाऱ्या डाॅक्टर्सचे पाणी तीन दिवस बंद करण्यात आले होते. हे सहन करण्यासारखे नाही. आता त्यांना आठ दिवसाची मुदत दिली आहे. आठ दिवसात जर मार्ग निघाला नाही तर अकरा तारखेला आम्ही रूग्णालयावर धडक देऊ आणि सुविधा मिळेपर्यंत तिथेच बसून राहू, असा इशारा दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *