राजीव चंदने
मुरबाड : नाशिक येथील आदिवासी आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांनी आपल्या न्याय्य मागण्यांसाठी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अध्यक्ष प्रमोद पवार आणि कार्याध्यक्ष सुनील लोणे यांच्या मार्गदर्शनाने भूमिपुत्र एल्गार संघटनेने आज मुरबाड तहसील कार्यालय येथे लक्षवेधी उपोषण आंदोलन केले. राज्यभर दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असताना, भूमिपुत्र एल्गार संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मात्र आदिवासी विद्यार्थ्यांच्या हक्कांच्या लढ्यासाठी रस्त्यावर उतरले होते.
नाशिकमधील आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत संघटनेने शासनाकडे निवेदन सादर केले. विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणावर मर्यादा आणणारा शासन निर्णय तात्काळ रद्द करावा, विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात तसेच राज्यातील आश्रमशाळांमध्ये झालेल्या विद्यार्थी मृत्यूंची स्वतंत्र एस. आय. टी. मार्फत चौकशी करण्यात यावी, अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “दहीहंडीचा उत्सव आनंदाचा असला तरी आदिवासी विद्यार्थ्यांचे भविष्य अधिक महत्त्वाचे आहे. हजारो विद्यार्थी आपल्या हक्कांसाठी संघर्ष करत असताना त्यांच्या पाठीशी उभे राहणे हेच आमचे सामाजिक कर्तव्य आहे.”
या आंदोलनात ठाणे जिल्हा सरचिटणीस दिनेश जाधव, जिल्हा उपाध्यक्ष सूरज राजपूत, ता. अध्यक्ष जगदीश शिद , अनिस अतार, बुधाजी खंडागळे, दया हिलम, बाळा दळवी, राहूल वाघ, कैलास खंडागळे, भरत जाधव, भगवान जाधव, सोन्या पवार या कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला. “दहीहंडीच्या जल्लोषापेक्षा आदिवासी विद्यार्थ्यांचे भविष्य महत्त्वाचे आहे; त्यांच्या हक्कांच्या लढ्यात आम्ही सदैव सोबत आहोत,” असा ठाम संदेश या आंदोलनातून देण्यात आला.
-००००
