डोंगरीत महिला गोविंदा पथकांच्या मुलींचा जल्लोष
दिनेश मराठे
मुंबई : शुक्रवारी मध्य रात्री बारा सव्वा बारा वाजता श्रीकृष्ण जन्म सोहळा मुंबईच्या कृष्ण मंदिरांसह अन्य मंदिरातही संपन्न झाला.गोविंदा गोपाळा चा गजर करीत दक्षिण मुंबईत गोविंदा पथकांची सकाळी १० वाजल्या पासूनच मानाच्या दहि हंड्या फोडण्यास चुरस वाढू लागली.शुक्रवारी दिवसभर मुंबईत आकाशातून श्रावणी सरीवरसरी बरसणाऱ्या पावसाचा शनिवारीही असाच मारा राहिल्यास गोविंदा पथकांना त्याच्या मोठया आव्हानाला सामोरे जावेच लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली होती मात्र शनिवारी मुंबईच्या काही भागात अगदीच तुरळक झालेल्या वरुणराजाच्या श्रावणी जलधारांचा होणारा अभिषेक, उंचावर बांधलेल्या दहीहंडीच्या उंचीच्या थरांचा अंदाज घेत विविध गोविंदा पथकांनी मोठया रुबाबात सलामी फोडल्या.
खास करून मुंबईच्या दक्षिण टोकाकडील कुलाबा, कफ परेड, वाळकेश्वर येथून पुढे फोर्ट, काळबादेवी, मलबार हिल,डोंगरी,उमरखाडी, गिरगावसह दक्षिण मुंबईतील मानाच्या दहीहंड्या गोविंदा पथकांनी विजयी सलामी देत फोडल्या. यावेळी गोविंदांच्या हंडी फोडण्याचा थरार आणि साहस पाहताना लोकांच्या काळजाचे ठोके चुकत होते. गोविंदांची शिस्तबद्धपणे एकावर एक मानवी मनोऱ्यांचे थर रचत दहीहंडी सर करण्यासाठी चाललेली लगबग माझगाव, डोंगरी, मशीद बंदर, कुलाबा, कफ परेड, मेट्रो, फोर्ट, वाळकेश्वर, मलबार हिल, उमरखाडी, कुंभारवाडा, खेतवाडी, भायखळा, नागपाडा, आग्रीपाडा, मुंबई सेंट्रल, बीडीडी चाळ, ग्रांट रोड, गिरगाव, ताडवाडी परिसरात पाहायला मिळत होती.
‘अरे बोल बोल बोल… बजरंग बली की जय’ आणि ‘गोविंदा रे गोपाळा यशोदेच्या तान्ह्या बाळा ‘ चा जयघोष करीत उमरखाडी नाक्यावर मनसेच्या राजन दळवी, आज्ञा भोसले आणि वीरेंद्र पाटील यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवाच्या हंडया विविध गोविंदा, महिला गोविंदा पथकांनी रचलेल्या चार, पाच आणि सहा थरांच्या पहिल्याच प्रयत्नात फुटल्याने त्यांनी मोठा जल्लोष केला. जे.जे. रुग्णालयाच्या नवयुग गोविंदा,यंग उमरखाडी गोविंदा,श्रीराम महिला गोविंदा पथक, श्रीकृष्ण गोविंदा पथक, यांनी ४,५,६,७ थरांची दहीहंडी मानवी मनोरे रचत तीन एक्के लावत सलामी देत पहिल्याच प्रयत्नात लीलया फोडल्या.
तरुण गोविंदाच्या चेहऱ्यावरील आनंद आणि उत्साह हंडी फोडल्यानंतर बक्षीस स्वीकारताना ओसंडून वाहताना दिसत होता.मुंबईकर गोविंदा आणि दहीहंडीचा थरारक खेळ अगदी सकाळपासून अनुभवत होते; तर गोविंदा आला रे आला, गोविंदा रे गोपाळा, शोर मच गया शोर, मच गया शोर सारी नगरी रे, ‘हमाल दे धमाल’मधील’ ढाक्कुमाकुम’सारखी लोकप्रिय गाणी सर्वत्र वाजत होती.या गाण्याच्या चालीवर तरुणाई जमिनीवर पाय रोवत ठेका देताना दिसत होती.गोकुळाष्टमीला उमरखाडीतून निघालेल्या पौराणिक शोभायात्रेचे गोविंदा प्रेमीनी,आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत स्वागत केले.उमरखाडी येथील मनसेच्या दही हंडी सोहळ्यात शाखा अध्यक्ष राजन दळवी,महिला शाखा अध्यक्ष आज्ञा भोसले, उषा पाटील, आशा पाटील, रुषाली लांडगे, राजेंद्र म्हात्रे, ललित ठाकूर, जी के वाघेला, रणछोड राठोड, संजय लांडगे यांनी विशेष मेहनत घेत कार्यक्रम यशस्वी केला.
