अनिल ठाणेकर
ठाणे : संकटाच्या प्रत्येक क्षणी नागरिकांच्या मदतीसाठी सर्वप्रथम धावून जाणाऱ्या ठाणे महापालिकेच्या आपत्ती योद्ध्यांच्या धाडसाचा राष्ट्रीय स्तरावर गौरव करण्यात आला आहे. अग्निशमन दलातील फायरमन, ठाणे आपत्ती प्रतिसाद दल (TDRF) आणि प्रादेशिक (RDMC) आपत्ती व्यवस्थापनाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या उल्लेखनीय सेवेसाठी प्रतिष्ठेचा ‘सेफ इंडिया ब्रेव्हरी अवॉर्ड २०२६’ प्रदान करण्यात आला. या सर्व जवानांचे महापौर शर्मिला पिंपळोलकर व आयुक्त सौरभ राव यांनी अभिनंदन केले आहे.
मुंबई येथे नुकतेच किंग एक्सपो मीडियातर्फे आयोजित पुरस्कार सोहळ्यात हा सन्मान प्रदान करण्यात आला. अग्निशमन, आपत्ती व्यवस्थापन तसेच सरकारी व निमशासकीय विभागांमध्ये धाडसी आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी- कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा पुरस्कार दिला जातो. या राष्ट्रीय पुरस्कारासाठी सुमारे दोन महिने आधी देशभरातून नामांकन अर्ज मागविण्यात आले होते. प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करून विविध क्षेत्रांतील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली. किंग एक्सपो मीडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. निरंजन कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या सोहळ्यात ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दल, टीडीआरएफ आणि प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या जवानांचाही गौरव करण्यात आला.
यावेळी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मानचिन्ह, ट्रॉफी व गौरव प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. ठाणे अग्निशमन दलाचे अधिकारी गणेश खेताडे, स्वप्नील सरनोबत तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वाय. एम. तडवी यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. आग, पूर, इमारत दुर्घटना किंवा इतर कोणत्याही आपत्तीच्या वेळी स्वतःचा जीव धोक्यात घालून नागरिकांचे प्राण वाचविण्यासाठी हे जवान अहोरात्र कार्यरत असतात. त्यामुळे त्यांना मिळालेला हा राष्ट्रीय सन्मान हा केवळ पुरस्कार नसून, नागरिकांच्या सुरक्षेसाठी दिलेल्या निस्वार्थ सेवेची पावती असल्याचे सेफ इंडियाचे बिमल नथवाणी यांनी सांगितले.या राष्ट्रीय गौरवामुळे ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेच्या कार्याची देशपातळीवर दखल घेण्यात आली असून, शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
000
