गरजू नागरिकांना मिळणार मोफत कायदेशीर सल्ला व मदत
अनिल ठाणेकर
ठाणे : असंघटित क्षेत्रातील कामगार, वंचित महिला, गरजू नागरिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना त्यांच्या कायदेशीर हक्कांची माहिती मिळावी तसेच मोफत कायदेशीर मदत उपलब्ध व्हावी, यासाठी REAP एज्युकेशन अॅक्शन प्रोग्राम आणि ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण (DLSA) यांच्या संयुक्त विद्यमाने कळवा येथे ‘जिल्हा विधी सेवा प्राधिकरण लीगल एड क्लिनिक’ सुरू करण्यात आले. या केंद्राचे उद्घाटन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव रविंद्र एस. पाजणकर यांच्या हस्ते झाले.
या केंद्रामुळे कळवा परिसरातील नागरिकांना कायद्याची माहिती, कायदेशीर सल्ला आणि न्यायालयीन प्रक्रियेसाठी आवश्यक मोफत कायदेशीर मदत जवळच्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. गरजू नागरिकांना आवश्यकतेनुसार मोफत वकील उपलब्ध करून देण्याची प्रक्रियाही या माध्यमातून सुलभ केली जाणार आहे.
उद्घाटनप्रसंगी रविंद्र एस. पाजणकर यांनी सांगितले की, न्याय हा समाजातील प्रत्येक व्यक्तीचा मूलभूत अधिकार आहे. केवळ आर्थिक परिस्थितीमुळे कोणताही नागरिक न्यायापासून वंचित राहता कामा नये. अनेक नागरिकांना आपल्या हक्कांची आणि कायद्याची पुरेशी माहिती नसते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने आपल्या हक्कांची आणि कायद्याची माहिती करून घेणे आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
उप कामगार आयुक्त विजय सर यांनी कामगार विभागामार्फत मिळणाऱ्या विविध सुविधा, बांधकाम कामगारांसाठीच्या योजना तसेच शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती दिली. सहाय्यक पोलीस आयुक्त संकेत देवळेकर आणि कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप भोसले यांनी कायदा व सुव्यवस्था, नागरिकांच्या तक्रारी आणि पोलिसांकडून करण्यात येणाऱ्या कार्यवाहीबाबत मार्गदर्शन केले. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजली अंधाळे यांनी महिला व बालकांची तस्करी, बालमजुरी आणि जबरदस्तीच्या कामाबाबत माहिती दिली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात रिप ( Reach Education Action Programme)चे संचालक जॉय फर्नांडिस यांनी संस्थेच्या सामाजिक व सेवाभावी कार्याची माहिती दिली. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शिक्षण, आरोग्य आणि कायद्याचे ज्ञान पोहोचवणे हे REAPचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी ‘लीगल एड क्लिनिक’च्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या मोफत कायदेशीर सेवांची माहिती देणाऱ्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. उद्घाटनानंतर नागरिकांसाठी प्रश्नोत्तर व संवाद सत्र घेण्यात आले. यामध्ये कायदेविषयक शंका, घरगुती समस्या, कामगारांचे हक्क आणि सरकारी योजनांबाबत नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले. उपस्थित अधिकारी व वकिलांनी त्यांच्या प्रश्नांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला पोलीस प्रशासन, कामगार विभाग, न्यायव्यवस्था आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसह पॅनेल वकील ॲड. तृप्ती पाटील उपस्थित होत्या. कळवा परिसरातील गरजू नागरिकांना न्यायव्यवस्थेशी जोडणारा महत्त्वाचा दुवा या केंद्राच्या माध्यमातून निर्माण होणार असून, ‘पैशाअभावी कोणीही न्यायापासून वंचित राहू नये’ या उद्देशाला बळ मिळणार आहे.
000000000
