अनिल ठाणेकर
ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त-१ पदी मेजर डॉ. नितिन राठोड (से.नि.) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी सोमवारी ठाणे महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त-१ पदाचा पदभार स्वीकारला. महापालिकेत रुजू होण्यापूर्वी ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खाजगी सचिव म्हणून कार्यरत होते.
वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ, भारतीय सैन्याचे सन्मानित माजी अधिकारी तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी अशी मेजर डॉ. नितिन राठोड यांची ओळख आहे. त्यांनी २००८ मध्ये प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस येथून एमबीबीएस पदवी प्राप्त केली. त्यानंतर २०१३ मध्ये डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजमधून ऑर्थोपेडिक्स विषयातील डिप्लोमा पूर्ण केला.
२०१४ ते २०१९ या कालावधीत त्यांनी भारतीय सैन्यात ऑर्थोपेडिक्स विभागात कमिशन्ड मेडिकल ऑफिसर म्हणून सेवा बजावली. या काळात अस्थिरोग आणि ट्रॉमा उपचार क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले. उत्कृष्ट सेवेसाठी त्यांना सेना सर्व्हिस मेडल, ऑपरेशन रक्षक मेडल, डीजी जम्मू-काश्मीर पोलीस मेडल आणि जीओसी १५ कॉर्प्स मेडलियन यांसारख्या प्रतिष्ठित सन्मानांनी गौरविण्यात आले.
२०२० ते २०२२ या कालावधीत त्यांनी अंबरनाथ नगर परिषदेत कोविड-१९ प्रतिसादासाठी नोडल अधिकारी म्हणून महत्त्वाची जबाबदारी सांभाळली. २०२२ ते २०२३ दरम्यान त्यांनी जिल्हा सैनिक अधिकारी म्हणून काम पाहिले. या काळात माजी सैनिकांचे कल्याण तसेच त्यांच्या विविध प्रश्नांच्या निराकरणासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
वैद्यकीय सेवा, सैनिकी अनुभव आणि प्रशासकीय कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या मेजर डॉ. नितिन राठोड यांच्या नियुक्तीमुळे ठाणे महानगरपालिकेच्या प्रशासकीय कामकाजाला अधिक बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *