अनिल ठाणेकर
ठाणे : ठाण्यातील रिंग मेट्रोबाधीतांचे आधी पुनर्वसन करावे. त्यानंतर प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू करावी, अशी आग्रही मागणी शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका परिषा सरनाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. त्याचबरोबरच निष्पाप नागरिकांना बेघर करून असहाय करू नका. अन्यथा, लोकमान्यनगरवासियांना रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशाराही परिषा सरनाईक यांनी दिला आहे.
महापालिका मुख्यालयात शुक्रवारी रिंग मेट्रो प्रकल्पाबाबत सादरीकरण झाले. त्यावेळी नगरसेविका परिषा सरनाईक यांनी विविध मुद्दे मांडले. त्याचबरोबर या विषयावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठविले आहे.
रिंग मेट्रो प्रकल्पाला लोकमान्यनगर, वर्तकनगर, शिवाईनगरवासियांचा पाठिंबा आहे. मात्र, या भागातील नागरिकांना उद्ध्वस्त करून हा प्रकल्प राबवता कामा नये. मेट्रो व महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या कुटुंबांना भाडे किंवा भाडेतत्त्वावरील घरे देणार असल्याचे सांगितले. पण ही घरे कुठं देणार ते स्पष्ट झाले नाही. लोकमान्यनगरसह १५०० ठाणेकरांची घरे उद्ध्वस्त करण्याऐवजी संपूर्ण रिंग मेट्रो भूमिगत पद्धतीने करण्यासाठी केंद्र सरकारने आणखी आर्थिक वाटा उचलावा, अशी मागणी परिषा सरनाईक यांनी केली.
ठाणे शहराची ओळख ही तळ्यांचे ठाणे अशी आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत उड्डाणपूल व मेट्रोच्या पूलांमुळे शहराची ओळख पुलांचे ठाणे अशी होऊ नये. उड्डाणपूल व मेट्रोच्या खांबांच्या गर्दीत ठाणे शहर कुठंतरी हरविल्यासारखं वाटते. शहराच्या विकासाला विरोध नाही, मात्र, शहरात मोठ्या प्रमाणावर उभारलेल्या खांबांना विरोध आहे. वाहतूककोंडी मुक्त प्रवासासाठी उड्डाणपूल हवेत. पण भूमिगत मार्गांचाही प्राधान्याने विचार करावा. मुंबई मेट्रो ३ ही भूमिगत आहे. मात्र, रिंग मेट्रोत केवळ २ स्थानके भूमिगत ठेवण्यात आली आहेत, याकडे परिषा सरनाईक यांनी लक्ष वेधले.
वर्तकनगर, रेमंड परिसराची लोकसंख्या सध्या २ लाखांपर्यंत आहे. या भागातील इमारतींचा पुनर्विकास व रेमंड संकुलातील नव्या इमारतींनंतर या भागाची लोकसंख्या ४ ते ५ लाखांवर झेपावेल. त्यामुळे रिंग मेट्रोच्या आराखड्यात वर्तकनगर व रेमंड परिसराचा समावेश करण्यासाठी कळवा-मुंब्रा डीपीआरच्या धर्तीवर नव्याने डीपीआर तयार करावा, अशी मागणी परिषा सरनाईक यांनी केली आहे.
उपवन तलावाच्या परिसरातून रिंग मेट्रो गेल्यानंतर तलाव व परिसराच्या नैसर्गिक सौदर्याला धोका पोचण्याची भीती आहे. ठाण्याचे ऑक्सिजन म्हणून उपवनची ओळख आहे. या प्रकल्पातून उपवन तलाव परिसराची हानी टाळावी. उपवन तलावाच्या समृद्ध परिसराचे जतन करावे, अशी सूचनाही परिषा सरनाईक यांनी केली आहे.
