शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते विजय साळवी यांचा जिल्हाधिकाऱ्यांना सवाल
कल्याण : कल्याण शहराचा समावेश स्मार्ट सिटी योजनेत होऊन दहा वर्षे उलटली तरी नागरिकांना अपेक्षित सुविधा मिळाल्या नाहीत, वाहतूक कोंडी कायम आहे आणि कोट्यवधींच्या प्रकल्पांचा हिशोबच मिळत नाही, असा थेट आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते विजय साळवी यांनी केला आहे. याबाबत त्यांनी कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त आणि ठाणे जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदन दिले आहे.
साळवी यांनी म्हटले आहे की, २०१६ मध्ये कल्याण स्मार्ट सिटीची घोषणा झाल्यावर सक्षम पायाभूत सुविधा, सुसूत्र वाहतूक व्यवस्था आणि सुरक्षित शहराची अपेक्षा निर्माण झाली होती. मात्र, दहा वर्षांनंतरही परिस्थिती जैसे थे आहे. माहितीच्या आधारे साळवी यांनी दावा केला आहे की, सॅटिस प्रकल्पाचा मूळ खर्च ४८१ कोटी रुपये होता, तो आता ६०२ कोटी रुपयांपर्यंत गेला आहे. शहरात लावण्यात आलेल्या १,०६५ स्मार्ट उपकरणांपैकी ३१२ उपकरणे बंद आहेत.
शिवसेनेच्या तीन प्रमुख मागण्या असल्याचे साळवी यांनी सांगितले. त्यामध्ये २०१६ पासून आजपर्यंत स्मार्ट सिटी अंतर्गत मंजूर, सुरू, पूर्ण आणि अपूर्ण असलेल्या सर्व प्रकल्पांची यादी, त्यासाठी मंजूर निधी, झालेला प्रत्यक्ष खर्च आणि जबाबदार यंत्रणा जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच, सॅटिसचा खर्च ४८१ कोटींवरून ६०२ कोटींवर कसा गेला, खर्चवाढीची कारणे, कामाच्या व्याप्तीत झालेला बदल आणि सक्षम प्राधिकाऱ्यांनी घेतलेले निर्णय सार्वजनिक करावेत, अशी मागणीही करण्यात आली आहे.
प्रकल्पांच्या विलंबामागील कारणे स्पष्ट करून जबाबदारी निश्चित करावी आणि स्वतंत्र परीक्षण करून कालबद्ध कारवाई करावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. ‘स्मार्ट सिटीच्या घोषणेनंतर नागरिकांच्या दैनंदिन जीवनात नेमके कोणते परिणाम दिसून आले? या प्रश्नाचे अधिकृत, स्पष्ट आणि पुराव्यांसह उत्तर मिळणे आवश्यक आहे,’ असे साळवी यांनी निवेदनात म्हटले आहे.
