रत्नागिरी जिल्ह्यातील नऊ शिक्षकांचा होणार गौरव; संगमेश्वरच्या शिक्षकाला विशेष ‘कला पुरस्कार’
अशोक गायकवाड
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत सन २०२६-२७ या वर्षासाठी देण्यात येणाऱ्या मानाच्या ‘आदर्श शिक्षक पुरस्कारां’वर कोकण विभागाच्या विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांनी अंतिम मोहोर उमटवली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमधून निवड झालेल्या नऊ शिक्षकांच्या नावांवर अधिकृत शिक्कामोर्तब झाले आहे. याचबरोबर संगमेश्वर तालुक्यातील एका शिक्षकाला त्यांच्या विशेष योगदानासाठी ‘विशेष कला पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देतानाच शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी उल्लेखनीय काम करणाऱ्या शिक्षकांच्या कार्याची दखल घेत दरवर्षी जिल्हा परिषदेकडून या पुरस्कारांची निवड केली जाते. यंदाच्या पुरस्कार निवडीला विभागीय आयुक्त रुबल अगरवाल यांनी अंतिम मान्यता दिल्यानंतर पुरस्कारांची अधिकृत घोषणा करण्यात आली. जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक शिक्षणाधिकारी मनिषा जगदाळे यांनी पुरस्कारांची घोषणा केली. *नऊ तालुके, नऊ शिक्षक* *मंडणगड* — निलेश तुळशीराम लोखंडे, उपशिक्षक, जि. प. प्राथमिक मराठी शाळा तिडे आदिवासीवाडी. *दापोली* — दिनेश कानू चिपटे, उपशिक्षक, जि. प. आदर्श शाळा भरणे खोंडारण. *खेड* — दिप्ती दिलीप यादव, पदवीधर विषय शिक्षक, जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा माणी नं. १. *चिपळूण* — विनोद जानू हुंबरे, पदवीधर शिक्षक, जि. प. शाळा चिवेली वरची. *गुहागर*— प्रभू रघुनाथ हंबर्डे, उपशिक्षक, जि. प. पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदूर घरटवाडी. *संगमेश्वर*— राजेश अर्जुन सावंत, पदवीधर शिक्षक, जि. प. पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा पूर. *रत्नागिरी* — रश्मी राजन वाडेकर, उपशिक्षका, जि. प. प्राथमिक आदर्श शाळा शिवार आंबेरे नं. २. *लांजा* — दिलीप शंकर चव्हाण, पदवीधर शिक्षक, जि. प. पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा पन्हळे नं. १. *राजापूर* — स्नेहा सुहास काडगे, उपशिक्षका, जि. प. पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा पाथर्डे. *संगमेश्वरच्या संदेश झेपले यांना ‘कला पुरस्कार’* आदर्श शिक्षक पुरस्कारांसोबतच यंदा संगमेश्वर तालुक्यातील संदेश प्रकाश झेपले यांना विशेष योगदानाबद्दल ‘कला पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. ते जि. प. शाळा साडवली सह्याद्रीनगर येथे उपशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. *शिक्षकांच्या कार्याचा गौरव* विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसोबतच शाळेचा विकास, नावीन्यपूर्ण उपक्रम, विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव आणि समाजाच्या सहभागातून शाळेच्या विकासासाठी योगदान देणाऱ्या शिक्षकांचा या पुरस्कारांच्या माध्यमातून गौरव करण्यात येणार आहे. विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांच्या अंतिम मान्यतेनंतर पुरस्कारांची घोषणा झाल्याने जिल्ह्यातील शिक्षकवर्गातून समाधान व्यक्त होत आहे.
